प्रधानमंत्री आवास योजनेची ४ लाख २१ हजार घरे पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:44 AM2019-08-05T03:44:13+5:302019-08-05T06:41:36+5:30
राज्य सरकारची माहिती; १० लाख ५१ हजार ९० जणांनी केली नोंदणी
मुंबई :प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ५ लाख ७८ हजार १०९ लाभार्थींना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी ४ लाख २१ हजार ३२९ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. राज्यभरातून १० लाख ५१ हजार ९० जणांनी यासाठी नोंदणी केली आहे. तसेच ग्रामविकास विभागामार्फत रमाई, शबरी, आदीम, पारधी इत्यादी राज्य पुरस्कृत घरकूल योजनांचीही अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती राज्य शासनातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या ७७ टक्के घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. मागील पाच वर्षांत ग्रामीण भागात यासाठी ११ हजार १५६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पूर्वी या योजनेतून देण्यात येणारे ९५ हजार रुपयांचे अनुदान वाढवून आता १ लाख ५० हजार रुपये करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला नुकतेच २ लाख ८६ हजार इतके नवीन उद्दिष्ट मिळाल्याचे राज्य शासनातर्फे सांगण्यात आले.
२०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमित करणार
ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २००० सालापूर्वीची ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे कोणतेही शुल्क न आकारता आणि ५०० चौरस फुटांवरील घरे शुल्क आकारून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२००० नंतरची आणि २०११ पूर्वीची शासकीय जागांवरील सर्व निवासी अतिक्रमणे शुल्क आकारून नियमित केली जातील. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील या घरधारकांना कायदेशीर हक्क प्राप्त होणार आहे. अशा अतिक्रमणधारकांची नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यावर ४ लाख ६० हजार इतक्या निवासी अतिक्रमणांची नोंद झाली आहे. त्यातील गावठाण क्षेत्रात असलेली सुमारे एक लाख निवासी अतिक्रमणे पडताळणी करून लवकरच नियमित केली जातील.