प्रिन्स करिम आगा खान यांना पद्मविभूषण
By admin | Published: April 10, 2015 04:06 AM2015-04-10T04:06:27+5:302015-04-10T08:49:26+5:30
भारतातील सामाजिक विकासात योगदान देणारे प्रिन्स करिम आगा खान यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने
मुंबई : भारतातील सामाजिक विकासात योगदान देणारे प्रिन्स करिम आगा खान यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी आगा खान डेव्हल्पमेंट नेटवर्क अंतर्गत सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आजवर अनेक समाजपयोगी कामे करण्यात आली, तर अनेकांना त्यातून आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळाली.
गेल्या शंभर वर्षांपासून दी आगा खान डेव्हल्पमेंट नेटवर्क भारतात कार्यरत आहे. १९०५ साली गुजरामधील मुंद्रा येथे पहिली आगा खान शाळा स्थापन झाली. आजघडीला दी आगा खान डेव्हल्पमेंट नेटवर्क सरकारसोबत संपूर्ण देशात कार्यरत आहे. आरोग्य, संस्कृती, शिक्षण, बालविकास, ग्रामविकास, नागरी समस्या आणि जल अशा विविध क्षेत्रातील विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
२ हजार ५०० गावांत ग्रामीण सहयोग प्रकल्प, ४०० शाळांत ग्रामीण शैक्षणीक कार्यक्रम, बहुराज्यस्तरीय मलनि:स्सारण प्रकल्प, समाजपयोगी प्रकल्प, २७ शाळा, अत्याधुनिक रुग्णालयांसह कर्करुग्णांचे पुनर्वसन केंद्राद्वारे आगा खान डेव्हल्पमेंट नेटवर्कने समाजकार्याची पाळेमुळे तळागाळात रोवली आहेत.
इस्लाम धर्माच्या शिया पथांचे प्रिन्स करिम आगा खान हे ४९ वे धार्मिक गुरु आहेत. १३ डिसेंबर १९३६ रोजी स्विर्त्झलंडमधील जिनिव्हा येथे त्यांचा जन्म झाला. नैरोबी, केनिया येथे बालपण व्यतित केले. स्विर्त्झलंडमधील ली रोझी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. हॉर्वर्ड विद्यापीठातून ‘इस्लामिक हिस्ट्री’ विषयांत पदवी संपादन केली.