प्रिन्स-प्रिन्सेसने जिंकली मने

By admin | Published: April 11, 2016 02:53 AM2016-04-11T02:53:41+5:302016-04-11T07:40:07+5:30

ब्रिटनच्या राजघराण्याबाबत भारतात असलेल्या प्रचंड औत्सुक्याचा प्रत्यय रविवारी मुंबईत आला. प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट मिल्टन यांनी दिवसभर महानगरातील विविध कार्यक्रमांना हजेरी

Prince-Princess won | प्रिन्स-प्रिन्सेसने जिंकली मने

प्रिन्स-प्रिन्सेसने जिंकली मने

Next

जमीर काझी ल्ल मुंबई
ब्रिटनच्या राजघराण्याबाबत भारतात असलेल्या प्रचंड औत्सुक्याचा प्रत्यय रविवारी मुंबईत आला. प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट मिल्टन यांनी दिवसभर महानगरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत मुंबईकरांची मने जिंकली. प्रत्येक ठिकाणचा त्यांचा सहज वावर आणि साधेपणा पाहून सर्वच चकित झाले.
राजपुत्र विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट यांनी दुपारी साडेबाराला हॉटेल ताजला भेट दिली. ‘२६/११’च्या हल्ल्याची दोघांनी माहिती घेतली. त्यानंतर ओव्हल मैदानावर लहान मुलांसमवेत क्रिकेट व फुटबॉलचा आनंद लुटला. वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावाला भेट दिली. परिसरातील रहिवाशांशी संवाद साधला. रात्री हॉटेल ताजमध्ये ‘रेड कार्पेट’ पार्टीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान, सोनम कपूर, अनिल कपूर यांच्यासह भारतातील उद्योगपती व बॉलीवूडमधील ताऱ्यांची भेट घेत भारतातील पहिल्या दिवसाच्या दौऱ्याची सांगता केली. सोमवारी सकाळी हे शाही दाम्पत्य दिल्लीला रवाना होणार आहे.
ब्रिटिश घराण्यातील प्रत्येकाने भारताला भेट दिली आहे. विल्यम्स यांच्या आई आणि प्रिन्सेस डायना यांना तर भारताबाबत विशेष आपुलकी होती. त्यामुळे प्रथमच भारत भेटीवर आलेल्या प्रिन्स विल्यम्स आणि केट यांच्या दौऱ्याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मुंबईत ओव्हल मैदानावर सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर त्यांची पत्नी मीना यांनी दोघांचे स्वागत केले. या ठिकाणी त्यांनी मॅजिक बस, चाईल्ड लाईन आणि डोरस्टेप या तीन स्वयंसेवी संस्थांच्या लहान मुलांबरोबर क्रिकेट व फुटबॉल खेळून आनंद लुटला. मैदानावरील लहानगे खेळाडू व आयोजकांबरोबर त्यांनी मनमोकळा संवाद साधला. मैदानाजवळ प्रचंड गर्दी झाली होती. अनेक जण मोबाइलमध्ये त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी धडपडत होते.
संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास प्रिन्स व केट वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव परिसरात पोहोचले. ‘स्माइल’ या स्वयंसेवी संस्थेच्या मुलांनी लेजिम व ढोल-ताशाच्या गजरात दाम्पत्याचे स्वागत केले. त्यांना औक्षण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा एनाक्षी शहा यांनी त्यांना बाणगंगा तलावाच्या इतिहासाची माहिती दिली. शाही दाम्पत्याने प्रेमाचे प्रतीक म्हणून पाण्यात फुले सोडली. तलावाच्या बाजूला असलेल्या महालक्ष्मी मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी रामकुंडनगर झोपडपट्टीत जाऊन तेथील रहिवाशांशी हस्तांदोलन केले आणि त्यांना भारतीय पद्धतीने नमस्कारही केला. छोट्या मोकळ्या जागेत फुटबॉल खेळणारी मुले पाहून विल्यम्सही खेळात सहभागी झाले. ब्रिटिश दूतावासाने आयोजित केलेली पार्टी रात्री ११वाजेपर्यंत रंगली.
> ताजच्या शेकडो खोल्या बुक
विल्यम्स व केट यांच्यासमवेत ब्रिटिश सुरक्षा एजन्सी व अन्य अधिकाऱ्यांसह प्रसारमाध्यमाचा मोठा लवाजमा आला आहे. या दाम्पत्याची व त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची व्यवस्था हॉटेल ताजमध्ये तर अन्य अधिकारी व पत्रकारांची व्यवस्था हॉटेल ट्रायडन्टमध्ये करण्यात आली आहे.
त्यासाठी दोन्ही हॉटेल्समधील शेकडो खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. त्याबाबत हॉटेल व्यवस्थापन व ब्रिटिश दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव माहिती देण्यात असमर्थता दर्शविली.
मुंबईकरांना
प्रचंड उत्सुकता
विल्यम्स आणि केट यांना पाहण्यासाठी मुंबईकर प्रचंड उत्सुक होते. त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. तरीही ओव्हल मैदानाच्या बाहेर कुंपणाच्या पलीकडे मोठी गर्दी झाली होती. बाणगंगा तलावाच्या परिसरातील घराच्या खिडकी, गॅलरीत उभे राहून मुंबईकरांनी दोघांना पाहिले. प्रिन्सेस डायनाच्या आठवणी
विल्यम्स व केटच्या मुंबई भेटीमुुळे राजपुत्रांची आई व दिवंगत प्रिन्सेस डायना यांच्या भारत भेटीच्या आठवणींना उजाळा मिळाला. डायना यांनी २४ वर्षांपूर्वी हॉटेल ताजला भेट दिली होती.
ताजमहललाही भेट देणार
विल्यम्स व केट सात दिवसांच्या दौऱ्यात मुंबईसह दिल्ली, हैदराबाद, आग्रा आदी ठिकाणी भेट देणार आहेत. ताजमहलचे दर्शन घेतल्यानंतर हे दाम्पत्य भूतानला रवाना होणार आहे.
कडेकोट बंदोबस्त
शाही दाम्पत्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. हॉटेल ताज, ओव्हल मैदान, बाणगंगा तलाव या ठिकाणी साध्या वेषासह गणवेशात प्रत्येक ठिकाणी सव्वाशे अधिकारी-कर्मचारी तैनात होते. त्यांच्या आगमनापूर्वी परिसरातील प्रत्येक वस्तू, व्यक्तीची तपासणी केली जात होती.
भारतीय पेहराव : ओव्हल मैदान व बाणगंगा तलावाला भेट देताना प्रिन्स विल्यम्स यांनी पांढरा शर्ट व निळी पॅन्ट परिधान केली होती, तर केट यांनी गुलाबी पंजाबी सूट घातला होता.

Web Title: Prince-Princess won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.