जातीवाचक मजकूर मुख्याधापकांच्या अंगलट
By admin | Published: April 6, 2017 02:23 AM2017-04-06T02:23:56+5:302017-04-06T02:23:56+5:30
व्हॉट्स अॅपवर बिनधास्तपणे जातीवाचक मजकूर टाकणे, एका मुख्याध्यापकाच्या चांगलेच अंगलट आले आहे
मुंबई : व्हॉट्स अॅपवर बिनधास्तपणे जातीवाचक मजकूर टाकणे, एका मुख्याध्यापकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल व अॅट्रॉसिटी प्रोहिबिशन अॅक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे गुन्हा रद्द करण्यासाठी मुख्याधापकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने त्याला माफी मागण्याचे निर्देश दिले. तूर्तास तरी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.
कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील एका शाळेत अर्जदार गेली सहा वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. त्याने केलेल्या याचिकेनुसार, तक्रारदार हा त्याच्या शिपायाचा मित्र आहे आणि या शिपायामध्ये आणि मुख्याध्यापकामध्ये वाद झाल्याने, शिपायाने त्याला चपलेने मारले होते. या प्रकरणी मुख्याध्यापकाने पोलिसांत तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, शिपायाच्या मित्राने मुख्याध्याकाविरुद्ध पोलीस ठाण्यात जातीवाचक पोस्ट व्हॉट्स अॅपवर टाकल्याचा आरोप केला.
तक्रारदाराने कुरुंदवाड पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, मुख्याध्यापकाने २०१५ मध्ये शाळेचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला. त्यात संबंधित शिपायाचाही समावेश आहे. मुख्याध्यापकाने २०१५ मध्ये एक जातीवाचक पोस्ट टाकली. त्यानंतर, २०१६ मध्ये मुख्याध्यापकाने दुसरी पोस्ट टाकली. मुख्याध्यापकाच्या पोस्टमुळे अनुसूचित जाती व जमातीमधील शिक्षकांचे मानसिक संतुलन ढासळल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे.
त्या तक्रारीची दखल घेत कुरुंदवाड पोलीस ठाण्याने मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. कनिष्ठ न्यायालयाने मुख्याध्यापकाची जामिनावर सुटका केली. मात्र, मुख्याध्यापकाने एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.
‘तुम्ही शिक्षक आहात आणि तुमच्याकडून अशा अपेक्षा नाहीत. देशातून अस्पृश्यता निवारण खूप वर्षांपूर्वीच झाले आणि तुम्ही अशा प्रकारे पोस्ट टाकता? आम्ही आता तरी एफआयआर रद्द करणार नाही. आधी तुम्ही माफी मागा,’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने मुख्याध्यापकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)