सौंदर्यप्रसाधनांच्या कारखान्यांवर छापा
By admin | Published: August 4, 2016 05:19 AM2016-08-04T05:19:57+5:302016-08-04T05:19:57+5:30
नामांकित कंपन्यांची नक्कल करून हुबेहूब त्यांच्या प्रमाणेच साबण, शॅम्पू आणि डिटर्जंट पावडर तयार करणाऱ्या घाटकोपरमधील एका कारखान्यावर बुधवारी एफडीएने छापा घातला
मुंबई : नामांकित कंपन्यांची नक्कल करून हुबेहूब त्यांच्या प्रमाणेच साबण, शॅम्पू आणि डिटर्जंट पावडर तयार करणाऱ्या घाटकोपरमधील एका कारखान्यावर बुधवारी एफडीएने छापा घातला. यावेळी या अधिकाऱ्यांनी या कारखान्यांतून ७४ हजार रुपयांचा बनावट साठा जप्त केला. कारखाना मालकांवर घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साबण, शॅम्पू, वॉशिंग पावडर, बॉडी स्प्रे या वस्तू प्रत्येक घरात प्रत्येकाला हव्या असतात. त्यामुळे याची मोठी मागणी असते. याचा गैरफायदा घेत गेल्या काही महिन्यांपासून घाटकोपर परिसरातील जीवदया लॅन्ड परिसरात काही नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादने तयार केली जात होती. कुठल्याही प्रकारची चाचणी न करताच या ठिकाणी उत्पादनांची निर्मिती करण्यात येत होती.
एफडीएला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी घाटकोपर पोलिसांच्या मदतीने याठिकाणी छापा घातला. यावेळी या कारखान्यातून पोलिसांनी ७४ हजारांचा माल जप्त केला. तसेच कारखाना मालक शांतीलाल शहा याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)