गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या घर, कार्यालयांवर छापे
By admin | Published: July 29, 2016 09:21 PM2016-07-29T21:21:19+5:302016-07-29T23:32:24+5:30
घोडबंदर रोड येथील बोरिवडे गावातील १०८ एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या उत्तन येथील घ
ऑनलाइन लोकमत
ठाणे : घोडबंदर रोड येथील बोरिवडे गावातील १०८ एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या उत्तन येथील घर तसेच कार्यालयावर ठाणे पोलिसांनी छापा टाकून झडती घेतली. जमीन घोटाळ्याशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. खोटी कागदपत्रे तयार करून बोरिवडे येथील जमीन बळकावल्याचा मेंडोन्सा यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी दोन वेळा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या मेंडोन्सांच्या मीरा-भार्इंदरमधील घर, कार्यालय तसेच फार्महाऊसवर नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अविनाश मोहिते, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी. टेळे यांच्या पथकाने हे झडतीसत्र राबवले. शुक्रवारी दिवसभर चाललेल्या या कारवाईत गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हा तपासाचा भाग असल्यामुळे या झडतीबाबतची कोणतीच माहिती देऊ शकत नसल्याचे मोहिते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.