अशोका बिल्डकॉन’वर प्राप्तीकर खात्याचा छापा
By admin | Published: April 5, 2016 10:11 PM2016-04-05T22:11:39+5:302016-04-05T22:11:39+5:30
अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे संचालक अशोक कटारिया यांचे निवासस्थान, कार्यालय व पिंपळगाव टोलनाका येथे मंगळवारी सकाळी प्राप्तीकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले़
तीन पथकांची कारवाई : कार्यालय, निवासस्थान, टोलनाक्याची झडती
नाशिक : अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे संचालक अशोक कटारिया यांचे निवासस्थान, कार्यालय व पिंपळगाव टोलनाका येथे मंगळवारी सकाळी प्राप्तीकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले़ सुरवातीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे मारल्याचे वृत्त होते, मात्र ईडीचा या छाप्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे कार्यालय, संचालक अशोक कटारिया यांचे गंगापूर रोडवरील ‘अंशुमान’ व पिंपळगाव बसवंतजवळील ‘पीएनजी टोलवे’ येथे एकाच वेळी छापा टाकला़ त्यात अधिकाऱ्यांनी अशोका बिल्डकॉनने केलेली कामे त्यासाठीचे पैशांचे व्यवहार आदींबाबतच्या फाईल्स व रेकॉर्ड तपासल्याचे समजते. प्रत्येक पथकामध्ये सात ते आठ कर्मचाऱ्यांचा समावेश होता़ सकाळपासून सुरू झालेले चौकशीचे काम सायंकाळपर्यंत सुरूच होते़ त्यापैकी पीएनजी टोलवेचे काम लवकर संपले तर कटारिया यांचे निवासस्थान व कार्यालय येथील चौकशी उशिरापर्यंत सुरू होती़ कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती किंवा त्यांची मदतही घेण्यात आली नव्हती़
खा. किरीट सोमय्या यांनी मात्र, तपास यंत्रणांकडे मी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालय व प्राप्तीकर विभागाची संयुक्त बैठक होवून हा छापा टाकण्यात आला आहे. कारवाई सुरू असल्यामुळे याबाबत बोलणे उचित होणार नाही, असे सांगितले. (प्रतिनिधी)