छुप्या डान्सबारवर छापा, ७५ अटकेत
By admin | Published: May 21, 2016 05:06 AM2016-05-21T05:06:46+5:302016-05-21T05:06:46+5:30
सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारना परवाने देण्याचे आदेश दिले असताना, समाजसेवा शाखेने अवैध पद्धतीने सुरू असलेल्या डान्सबारना लक्ष्य केले.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारना परवाने देण्याचे आदेश दिले असताना, समाजसेवा शाखेने अवैध पद्धतीने सुरू असलेल्या डान्सबारना लक्ष्य केले. गुरुवारी समाजसेवा शाखेने मुंबईतील चार डान्सबारवर कारवाई केली. या छापेमारीत तब्बल ७५ जणांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली. यातून ६० बारबालांची सुटका करण्यात आली.
समाजसेवा शाखेच्या कारवाई सत्रामुळे बार असोसिएशनच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात डान्सबारसंदर्भात अंमलात आणलेल्या महाराष्ट्र अश्लील नृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील ज्या डान्सबारने अटी व नियमांची पूर्तता केली आहे अशा बारना परवानगी देण्याचे आदेश सर्वोच न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून काही डान्सबार मालकांनी छुप्या पद्धतीने छमछम सुरू केल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुरुवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकण्यास सुरुवात केली. ग्रॅण्टरोड येथील तेजस बार, घाटकोपर येथील मेहफिल बार तर अंधेरीच्या पिंक प्लाझा आणि मुंबई सेंट्रल येथील समुंदर बारवर छापा टाकला. या कारवाईत ६० बारबालांची सुटका करत ७५ जणांना अटक करण्यात आली आहे.
१२ एप्रिल रोजी विधानसभेत डान्सबार नियमन विधेयक संमत करण्यात आले आहे. या विधेयकानुसार नियमभंग किंवा महिला कर्मचाऱ्यांचे शोषण किंवा बारमध्ये अश्लील नृत्य अशा प्रकारांची जबाबदारी बारमालकावर असणार आहे. नियमभंग केल्यास बारमालकाला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. डान्सबार संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरापर्यंतच सुरू ठेवावेत अशी तरतूदही त्यात आहे.