खालापूरमध्ये छापा; ५५ कोटी रुपयांची तूरडाळ जप्त

By admin | Published: October 28, 2015 02:07 AM2015-10-28T02:07:42+5:302015-10-28T02:07:42+5:30

राज्यात तूरडाळीच्या गोदामांवर धाडसत्र सुरू असताना, खालापूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने पेण-खोपोली राज्यमार्गावर रानसई येथे डाळ कंपनीवर छापा टाकून ५५ कोटी रुपयांचा बेकायदा साठवून ठेवलेला

Printed in Khalapur; Rs 55 crores seized of Turadal | खालापूरमध्ये छापा; ५५ कोटी रुपयांची तूरडाळ जप्त

खालापूरमध्ये छापा; ५५ कोटी रुपयांची तूरडाळ जप्त

Next

खालापूर : राज्यात तूरडाळीच्या गोदामांवर धाडसत्र सुरू असताना, खालापूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने पेण-खोपोली राज्यमार्गावर रानसई येथे डाळ कंपनीवर छापा टाकून ५५ कोटी रुपयांचा बेकायदा साठवून ठेवलेला डाळसाठा जप्त करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात डाळीचा साठा सील करण्यात आल्याने, कंपनी प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
तूरडाळीची किंमत अवास्तव वाढल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळ गायब झाली असताना, डाळीचा कृत्रिम साठा करणाऱ्यांवर राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने, राज्यात सर्वत्र डाळीच्या साठ्यांवर धाडी पडत आहेत. रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील रानसई येथे, ईटीसी अ‍ॅग्रो लि. कंपनीच्या गोडाउनमध्ये तूरडाळीचा असणारा ६० हजार टन साठा छापा टाकून सील करण्यात आला. जिल्हाधिकारी, जिल्हापुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शशिकांत नाचण आणि त्यांचे सहकारी तालुका पुरवठा अधिकारी भोळे, एस. टी. यमाजी, साळुंखे, मंडळ अधिकारी नाईक, तलाठी भरत सावंत, मिरगने, प्रशांत ढाकणे, अजित जाधव यांच्याकडून दोन दिवस डाळीची मोजदाद सुरू होती. कंपनीमध्ये परदेशातून मागविण्यात आलेल्या डाळीचा ६० हजार टन साठा या वेळी आढळून आल्याने आणि साठा करण्यासाठी आवश्यक परवानगी नसल्याचे कारवाईत उघड झाले आहे. याबाबत खालापूर पोलीस स्थानकात कंपनी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीमध्ये परदेशातून आयात केलेल्या तूरडाळीचा मोठा साठा आढळून आला आहे. या वेळी छाप्यादरम्यान कंपनी प्रशासनाचे परवाने तपासणी करण्यात आले असताना, राज्य शासनाच्या तहसील पुरवठा विभागाकडून देण्यात येणारा परवाना कंपनी प्रशासनाकडे नसल्याचे समोर आल्याने, हा साठा जीवनाश्यक वस्तू साठा अधिनियम आणि महाराष्ट्र शेडुल्ड कमोडिटी २०१५च्या अटी-शर्थीचा भंग केल्यासंबंधी खालापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे, असे खालापूरचे तहसीलदार शशिकांत नाचण यांनी सांगितले.

Web Title: Printed in Khalapur; Rs 55 crores seized of Turadal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.