लग्नापूर्वीच ती प्रियकरासोबत घोड्यावरून पळाली
By admin | Published: March 10, 2017 01:28 AM2017-03-10T01:28:44+5:302017-03-10T08:12:06+5:30
बोहल्यावर चढण्यापूर्वीच नववधूने प्रियकराबरोबर घोड्यावरुन पलायन केल्याची घटना दहिगाव-ने (ता. शेवगाव) येथे मंगळवारी रात्री घडली.
मिरी (जि. अहमदनगर) : बोहल्यावर चढण्यापूर्वीच नववधूने प्रियकराबरोबर घोड्यावरुन पलायन केल्याची घटना दहिगाव-ने (ता. शेवगाव) येथे मंगळवारी रात्री घडली. कामत शिंगवे येथील या वराचा विवाह दहिगाव-ने येथील सधन कुटुंबातील मुलीबरोबर निश्चित झाला होता. सात मार्च ही लग्नाची तारीखही ठरली होती. विवाहाची जय्यत तयारी वधू पक्षाकडे सुरू होती.
नवरदेवाने वरातीसाठी डी.जे.वाल्याला सुपारी दिली. वधू-वरांना हळदही लागली. अन् लग्नाच्या आदल्या रात्री नववधुने मध्यरात्री दोनच्या सुमारास अंगावरील ओल्या हळदीसह प्रियकरासोबत घोड्यावरुन पलायन केले. नववधूला रात्री काही पाहुण्यांनी पाहिले. परंतु कोणालाही संशय आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नववधू घरात, मैत्रिणीकडे व गावात कुठेच न दिसल्याने सर्वत्र शोध घेण्यात आला. परंतु नववधू कोठेच आढळली नाही. या नववधूला नवरदेव पसंत नव्हता, अशी माहिती तिच्या मैत्रिणींकडून कळाली. तसेच तिचे घोड्यांची खरेदी- विक्री करण्याबरोबर प्रेमप्रकरण होते, अशीही चर्चा आहे.
कामत शिंगवे गावातही विवाहाची जय्यत तयारी होती. लग्नाचा थाटमाट उरकला होता. नवरदेवाच्या वऱ्हाडाची विवाहस्थळी जाण्यासाठी लगीनघाई सुरू होती. नवरदेव मारुती मंदिराच्या दिशेने डिजेच्या तालावर वाजत गाजत जात असताना अचानक वधूकडील जवळच्या नातलगाचे निधन झाल्याने विवाह होणार नाही, असा निरोप वधूपक्षाकडून फोनद्वारे कळवण्यात आला.
लग्न मोडल्याची कुणकुण लागताच कामतशिंगवे गावातील वातावरण गंभीर बनले. दुसरी कोणतीही मुलगी उभी करुन विवाह उरकून घेतल्यास आमची काही हरकत नाही, असे वधूकडील मंडळींना वराकडील मंडळींनी कळविले होते. परंतु ऐनवेळी लग्नासाठी कोणतीही मुलगी तयार झाली नाही.