राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात जनतेच्या सूचनांना प्राधान्य

By admin | Published: April 8, 2017 03:40 AM2017-04-08T03:40:51+5:302017-04-08T03:40:51+5:30

पनवेल शहराच्या विकासासाठी महापालिकेकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

Priority of public instructions in the manifesto of political parties | राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात जनतेच्या सूचनांना प्राधान्य

राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात जनतेच्या सूचनांना प्राधान्य

Next

अरुणकुमार मेहत्रे,
कळंबोली- पनवेल शहराच्या विकासासाठी महापालिकेकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांकडून सुध्दा याबाबत ‘व्हिजन’ ठरविण्याकरिता पुढाकार घेतला आहे. महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना तयार करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात थेट जनतेच्या सूचनांचा विचार करण्यात येत आहे. त्यानुसार भाजपाने ‘आपले शहर आपला अजेंडा’ ही संकल्पना राबवली आहे, तर शेकापने ‘सूचना व्हॅन’ सुरू करून भाजपाला शह देण्यास सुरुवात केली आहे.
पनवेलमध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यावर महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. शिवाय रायगड जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव म्हणूनही या महापालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे जंक्शन पनवेल रेल्वे स्थानकावर होत असून नैना, पुष्पकनगर ही दोन प्रस्तावित शहरे बाजूला वसविण्यात येत आहेत.
लोह-पोलाद मार्केट, महत्त्वाचे महामार्ग महापालिका हद्दीतून जातात. या सर्व गोष्टींचा विकास होत असताना दर्जेदार पायाभूत सुविधांचीही गरज निर्माण झालेली आहे. सिडकोने नागरी वसाहती विकसित केल्या असल्या तरी अनेक ठिकाणी त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे बनणार आहेत. या भागाकरिता खास व्हिजन ठेवून काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा मुद्दा उचलत भाजपा आणि शेकापने महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत थेट मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आपले शहर आपला अजेंडा’ अशा आशयाचे बॅनर आणि होर्डिंग्ज लावून भाजपाने पनवेलकरांचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये शिक्षण, वैद्यकीय, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध मुद्द्यांना स्पर्श करणारे फलक लावण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त पक्षाच्या वतीने घरोघरी सूचना पत्रिका पाठवून त्यामध्ये नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया, वेबसाईटवर सुध्दा सूचना करण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाने ‘सूचना व्हॅन’ तयार करून ती वसाहतीत पाठविण्यात येत आहे. बुधवारी ही व्हॅन नवीन पनवेल येथे आली होती. त्यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी नागरिकांबरोबर संवाद साधला.
विशेष करून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. त्यांना सूचना पत्रिका सुध्दा देण्यात आल्या होत्या. त्यावर रस्ते, पाणी, वीज या मूलभूत प्रश्नांबरोबर इतर अनेक विषय हाताळण्यात आले.
>मोबाइल अ‍ॅप्सवर प्रचार
इच्छुक उमेदवार लोकांपर्यंत पोहचण्याकरिता वेगवेगळ्या शक्कल लढवित आहेत. त्याकरिता सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. या सर्व गोष्टीत माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी सर्वात आधी फ्री वायफाय उपलब्ध करून दिले. आता त्यांनी स्वत:चा अ‍ॅप तयार केला असून त्यामध्ये कार्यालयाचे लोकेशन, संपर्क क्रमांक, मतदार याद्या, बातम्या,सामाजिक उपक्र माची माहिती आहे. सोशल मीडियात लिंक करण्याची सोय करण्यात
आली आहे.

Web Title: Priority of public instructions in the manifesto of political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.