शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास प्राधान्य
By admin | Published: May 2, 2015 01:49 AM2015-05-02T01:49:47+5:302015-05-02T10:24:43+5:30
दुष्काळ, गारपिटीने ग्रस्त असलेल्या हवालदिल शेतकऱ्यांना मदत करीत त्यांचे अश्रू पुसण्याला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे,
मुंबई : दुष्काळ, गारपिटीने ग्रस्त असलेल्या हवालदिल शेतकऱ्यांना मदत करीत त्यांचे अश्रू पुसण्याला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज येथे केले. राज्याच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे शासनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ झाला. त्या वेळी राज्यपाल बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर स्नेहल आंबेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारने निधी दिला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून भरघोस पिके घेण्यावर भर दिला जाईल. जलयुक्त शिवार योजनेतून जलक्रांतीच होईल. या जलक्रांतीच्या यशस्वितेसाठी कॉर्पोरेट क्षेत्राने सामाजिक जबाबदारी म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात ३० थीम बेस्ड स्मार्ट शहरे उभारण्यात येतील़ दिवंगत प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना राबविली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या जागेवरील स्मारकासाठी जागा मिळाल्याने स्मारकाचा मार्ग मोकळा झाल्याचे राज्यपाल म्हणाले. सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा त्यांनी उल्लेख केला. (विशेष प्रतिनिधी)