फटाके फोडण्याचा नियम न पाळल्यास तुरूंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 07:01 AM2018-11-05T07:01:48+5:302018-11-05T07:02:02+5:30
सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास आठवडाभराचा तुरूंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे.
- जमीर काझी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास आठवडाभराचा तुरूंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे. ध्वनिप्रदूषणाच्या कायद्याचे उल्लंघन केल्यास पूर्वीपासूनच या शिक्षेची तरतूद आहे. रात्री आठ ते दहा या दोन तासाव्यतिरिक्त फटाके उडविल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश गृह विभागाने काढले आहेत.
राज्यात बेकायदा फटाका विक्री
होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांबाबत दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.
फटाक्यांची विक्री आणि ते उडविण्याबाबत २३ नोव्हेंबरला न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याअनुषंगाने गृह विभागाने शनिवारी राज्याचे पोलीस महासंचालक, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस प्रमुखांना न्यायालयाच्या निकालाची प्रत व त्यासंबंधी सूचनाचे पत्र ई-मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. संबंधित अधिकाºयांनी आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या घटक कार्यालयांना त्याबाबत सूचना केली आहे.
फटाका विक्री आणि ते उडविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना राज्यातील अतिवरिष्ठ अधिकाºयांना दिली आहे. त्याचप्रमाणे बेकायदा फटाका विक्री होऊ नये, याबाबतही विशेष खबरदारी त्यांनी घ्यायची आहे.
- अमिताभ गुप्ता,
विशेष प्रधान सचिव, गृह विभाग
फटाके उडविणे व विक्रीबाबतचे निर्बंध
दिवाळी, अन्य सण, विवाह समारंभावेळी रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवायचे आहेत.
कमी प्रदूषणकारी व कमी ध्वनिपातळी असलेल्या फटाकेविक्रीला मान्यता
फटाक्याच्या माळांना परवानगी नाही
पेसो कायद्यानुसार फटाके उडविण्याच्या केंद्रबिंदूपासून चार मीटर अंतरात १२५ ते १४५ डेसिबल आवाजाचे बंधन