पन्हाळ्यात पोलिसांच्या डोळ्यांत चटणी फेकून कैदी फरार

By admin | Published: December 9, 2014 01:12 AM2014-12-09T01:12:03+5:302014-12-09T01:12:03+5:30

भरदिवसा थरार : पोलिसाला केले रक्तबंबाळ; मोटारसायकल जप्त

Prisoner throws chutney into police's eyes | पन्हाळ्यात पोलिसांच्या डोळ्यांत चटणी फेकून कैदी फरार

पन्हाळ्यात पोलिसांच्या डोळ्यांत चटणी फेकून कैदी फरार

Next

कोल्हापूर : जन्मठेपेच्या प्रकरणातील कैदी बंदोबस्तासाठी असलेल्या दोघा पोलिसांच्या डोळ््यात चटणीपूड टाकून, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून तिघा साथीदारांच्या मदतीने बेड्यांसह दुचाकीवरून पळून गेल्याची घटना आज, सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. बापू बिरू प्रकरणाची आठवण करुन देणारा हा प्रकार पन्हाळ्यावरील भाडेकर बोळ परिसरात घडला. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. रात्री या प्रकरणातील मोटारसायकल पोलिसांना कोडोली परिसरात उसात सापडली.
विजय ऊर्फ बबलू संजय जावीर (वय ३५, रा. कारंडे, मळा शहापूर, इचलकरंजी) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. तिघा साथीदारांच्या मदतीने तो पळून गेला आहे. हे साथीदार कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल अशोक गंगाराम कोरवी (वय ४८ रा. पोलीस वसाहत कोल्हापूर) व पोलीस नाईक जावेद गौस पठाण (३२ रा.पोलीस लाईन, जुनी वसाहत, कोल्हापूर) यांच्यावर पन्हाळ््यातच प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शाहूवाडीचे प्रभारी उपअधीक्षक किसन गवळी यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केली.
घडले ते असे : कैदी विजय जावीर हा सध्या बिंदू चौक सबजेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी आहे. त्याने कोतोली (ता.पन्हाळा) येथील सराफास लुटल्याप्रकरणी २०१३ मध्ये त्याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची पन्हाळयातील प्रथमवर्ग न्यायालयात आज सुनावणी होती. त्यासाठी मुख्यालयातील दोघे पोलीस आज सकाळी जावीरला सबजेलमधून ताब्यात घेऊन एस.टी.तून पन्हाळ््यास गेले. एस. टी. स्टँडवर उतरल्यानंतर बेड्यासह जावीर मध्यभागी व दोघे पोलीस दोन्ही बाजूला असे घेवून ते चालत निघाले होते. स्टँडवरून भाडेकर बोळातून कोर्टाकडे जाण्याचा हा मधला मार्ग आहे. त्यामध्ये रस्त्यांतच थोड्या पायऱ्या लागतात. या मार्गाने जावीरला पोलीस नेतात याची माहिती त्याला होती. त्यामुळे त्याच्या पाठोपाठ त्याचे तिघे साथीदार दोन मोटारसायकलवरून एस.टी.च्या पाठीमागून पाठलाग करत आले होते. पायऱ्या चढत जात असताना त्या साथीदारांनी येऊन पोलिसांच्या डोळ््यात चटणी टाकून त्यांना बाजूला ढकलले. तेवढ्यात जावीर याने बेड्यासह हाताला हिसडा दिला. पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता जावीर ने हेडकॉन्स्टेबल कोरवी यांच्या नाकावर बेड्यासह ठोसा दिल्याने ते रक्तबंबाळ झाले. एक सहकारी रक्ताने माखलेले पाहून दुसरे पोलीसही काहीसे भांबावून गेले. इतक्यात ते चौघेही पायऱ्यांवरून खाली पळत आले. रस्त्यावरच त्यांनी मोटारसायकली लावल्या होत्या. त्यावर बसून ते पसार झाले. काही कळायच्या आतच हा प्रकार घडला. पोलिसांच्या तावडीतून कैदी पळून गेल्याची वार्ता गडावर पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.
थरारक पाठलाग
दरम्यान, नेमके याचवेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पंकज शिरसाट हे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या संघर्ष यात्रेचा बंदोबस्त करून वाघबीळातून पन्हाळ््याकडे येत होते. त्यांना तातडीने कैदी पळून गेल्याचा मेसेज देण्यात आला. त्याचवेळी नेमका जावीर हा आरोपी हातातील बेड्यासह मोटारसायकलीवरून पळून निघाल्याचे शिरसाट यांच्या गाडीतील पोलिसांनी पाहिले. त्यांनी जावीरला ओळखले. पोलिसांनी लगेच त्याचा पाठलाग सुरू केला. त्याचवेळी त्याचे अन्य दोघे साथीदार मोटारसायकलवरून कोल्हापूरकडे पळून जाण्यात यशस्वी झाले. जावीर कोडोलीकडे निघाला होता. कोडोली पोलीस ठाण्याच्या अलीकडील बाजूस कॅनॉलमध्ये गाडी टाकून उसातून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी त्या परिसराची नाकाबंदी केली. यंत्रणा सतर्क झाली. तो परिसर रात्री उशिरापर्यंत पालथा घातला परंतू कैदी जाविर सापडला नव्हत्


विजय ऊर्फ बबलू जावीर यास सहा महिन्यांपूर्वी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तो पॅरोल रजेवर बाहेर आला होता. रजा संपल्यानंतर तो पुन्हा कारागृहात हजर न होता फरार झाला. त्याने स्वतंत्र टोळी तयार करुन सराफांना लुटण्याचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. सांगली जिल्ह्यात त्याने चार लूटमारीचे गुन्हे केले आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याच्यासह सहाजणांना अटक केली होती. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या सहाजणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना सादर केला होता. रितेशकुमार यांनी त्यास मंजुरीही दिली होती. तो अतिशय खतरनाक गुन्हेगार असून, त्याला न्यायालयात व शासकीय रुग्णालयात नेताना विशेष खबरदारी घेण्याची सूचना पोलीसप्रमुख सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांना केली होती.


बापू बिरूची आठवण
हातकणंगले तालुक्यातील मजले खिंडीतून कुख्यात दरोडेखोर बापू बिरू वाटेगावकर यांलाही त्याच्या साथीदाराने असेच पळवून नेले होते. त्या घटनेची आठवण ताजी झाली.

शिरगावे खून
प्रकरणातील कैदी
विजय जावीर हा शहापूर येथील रहिवाशी असून, तो गुंडप्रवृत्तीचा होता. सुमारे चार वर्षांपूर्वी विक्रमनगर येथे झालेल्या इम्तियाज शिरगावे याच्या खून प्रकरणात तो आरोपी आहे. येथील शहापूर-कारंडे मळा येथे वाढदिवसाचा डिजिटल फलक लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान शिरगावे याच्या खुनामध्ये झाले होते.
त्यामध्ये जावीर यास जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तुरूंगात असताना अन्य आरोपींबरोबर आलेल्या संपर्कामुळे त्याची गुंडगिरीची पार्श्वभूमी वाढली. दरम्यान, तो पॅरोलवर सुटला असताना फरार झाला होता.
जावीरवरील गुन्हे
जाविर याच्यावर पोलीस कब्जातून मारहाण करून पळून नेणे असा भारतीय दंडविधान (कलम ३३३), सरकारी कामात अडथळा (कलम ३५३) व साथीदारांसमवेत कट (कलम २२४ व २२५) असा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक यशवंत गवारी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Prisoner throws chutney into police's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.