शिक्षा भोगणारे कैदी बनणार ‘उद्योगी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:44 AM2019-07-09T06:44:03+5:302019-07-09T06:44:08+5:30
एक कोटीच्या खरेदीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील; येरवडा, नागपूरसह चार मध्यवर्ती, एका जिल्हा कारागृहाला मिळणार साधने
जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध गुन्ह्यांसाठी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना खऱ्या अर्थाने ‘उद्योगी’ बनविण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यानुसार विविध ठिकाणच्या ५ मध्यवर्ती कारागृहांत तब्बल एक कोटीची लघुउद्योगासाठी आवश्यक यंत्र व साधन सामग्री खरेदी करण्यात येणार आहे. तुरुंग प्रशासनाने त्यासाठी पाठविलेल्या खरेदीच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला.
पुण्यातील येरवड्यातील मध्यवर्ती व खुले, नागपूर, कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात या उपकरणांची लवकरच खरेदी करण्यात येईल. कारागृह उद्योग विकासांतर्गत ती घेतली जातील. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचे जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कैद्यांना शिक्षा भोगत असतानाच स्वयंरोजगाराचे महत्त्व कळावे, जेणेकरून बाहेर परतल्यानंतर त्यांना गुन्हेगारी कृत्यापासून दूर राहून उदरनिर्वाहासाठी साधन मिळावे, यासाठी त्यांच्याकडून कारागृहात शेतीपासून ते यंत्रमाग, चर्मकलापासून ते वस्त्राद्योगापर्यंत विविध कामे करून घेतली जातात. नागपूर, कोल्हापूर, नाशिक ही तीन मध्यवर्ती कारागृहे, येरवड्यातील मध्यवर्ती व खुले जिल्हा कारागृहातील कैद्यांची संख्या अधिक असून त्यांच्या तुलनेत उपकरणे कमी असल्याची ओरड अधीक्षकांकडून होत होती. त्यामुळे साधन खरेदीची मागणी करण्यात आली होती. तुरुंग प्रशासनाच्या मुख्यालयातून त्यानुसार एक कोटींची उपकरणे खरेदीचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला. वित्त विभागाने खर्चास मंजुरी दिल्यानंतर खरेदीवर शिक्कामोर्तब केल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
राज्यात सध्या एकूण ९ मध्यवर्ती कारागृहे असून त्याशिवाय जिल्हा स्तरावरील अ, ब, क व ड या चार स्तरांवर ४५ अशी ५४ कारागृहे आहेत. या ठिकाणी गुन्हेगाराच्या स्वरूपानुसार कच्चे कैदी (अंडर ट्रायल) व शिक्षाधीन कैदी ठेवले जातात.
कारागृहात सद्य:स्थितीत २३ हजार ७५८ कैदी
राज्याच्या कारागृहांतील अधिकृत बंदी क्षमता २२ हजार ३२० इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात सद्य:स्थितीत या ठिकाणी २३ हजार ७५८ कैदी असल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये २२ हजार ४०७ पुरुष तर १३५१ महिला कैदी आहेत. त्यापैकी ८५ टक्के कैदी हे न्यायाधीन म्हणजे कच्चे कैदी (अंडर ट्रायल) असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
या उपकरणांची होणार खरेदी
यंत्रमाग, तारकाम, वॉशिंग मशिन, व्हॅक्युम क्लीनर, असेम्ब्ली वायंडर, सोलर अंबर चरखे, ली स्ट्रॅथ टेस्टर इत्यादी.