खुल्या कारागृहात कैद्यांचे उपोषण
By admin | Published: January 17, 2015 05:38 AM2015-01-17T05:38:25+5:302015-01-17T05:38:25+5:30
येरवड्यातील खुल्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांना कारागृहाच्या पोलिसांनी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.
पुणे : येरवड्यातील खुल्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांना कारागृहाच्या पोलिसांनी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याचा निषेध म्हणून या कैद्यांनी उपोषण आंदोलन केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या मारहाणीमागे संजय दत्तला वारंवार मिळणारी फर्लो हे कारण असल्याचे समजते.
संजय दत्तला कायमच सुटी मंजूर होत आली आहे. इतर कैद्यांना मात्र ती लवकर मिळत नाही. त्यामुळे काही कैद्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती विचारली होती. यासोबतच काही दिवसांपूर्वी खुल्या कारागृहातील शेतामध्ये असलेल्या देवी मंदिरामध्ये मोबाइलही आढळून आला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर कैद्यांना दबावात ठेवणे आवश्यक असल्यामुळे किरकोळ कारण काढून दोन कैद्यांना मारहाण करण्यात आली, असे सांगण्यात येते. कैद्यांना मारहाण होण्यामागे हीच कारणे आहेत का अन्य तात्कालीक कारण आहे, हे मात्र समजू शकले नाही.
खुल्या कारागृहाचे अधीक्षक मिलिंद कुर्लेकर यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कोणत्याही कैद्याला मारहाण झाली नसून उपोषणही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)