पैठण कारागृहात कैद्यांचे उपोषण

By admin | Published: April 11, 2015 02:04 AM2015-04-11T02:04:56+5:302015-04-11T02:04:56+5:30

मुदत संपूनही सुटका होत नसलेल्या २१ कैद्यांच्या सुटकेसाठी पैठण कारागृहातील सर्वच्या सर्व ३६६ कैद्यांनी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे

Prisoners Fasting In Paithan Prison | पैठण कारागृहात कैद्यांचे उपोषण

पैठण कारागृहात कैद्यांचे उपोषण

Next

पैठण (जि़ औरंगाबाद) : मुदत संपूनही सुटका होत नसलेल्या २१ कैद्यांच्या सुटकेसाठी पैठण कारागृहातील सर्वच्या सर्व ३६६ कैद्यांनी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. राज्य शासनाने ९ जुलै २०१४नंतर काढलेले जन्मठेप भोगणाऱ्या या कैद्यांचे सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ या कैद्यांनी उपोषणास्त्र उपसले आहे.
चांगली वर्तणूक असलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांना शेवटच्या टप्प्यात पैठण येथील खुल्या कारागृहात ठेवण्यात येते. १४ वर्षांचा कैद्यांचा अहवाल तयार करून तो कारागृह प्रशासनाकडून राज्य शासनाला दिला जातो. यावरून राज्य सरकार संबंधित कैद्यांच्या सुटकेचे आदेश पारित करते. मात्र, अशा प्रकारच्या कैद्यांची सुटका करण्याचे अधिकार राज्य शासनास नसल्याचे सुप्रीम कोर्टाने १९ जुलै २०१४ रोजी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. याबाबत गृह विभागाने २५ जुलै २०१४ रोजी अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांना लेखी पत्र देत कैद्यांच्या सुटकेची १४ वर्षे अहवाल लेखन प्रक्रिया करू नये व ९ जुलै २०१४नंतर निघालेल्या कैद्यांच्या सुटकेचे आदेश रद्द करण्यात यावेत, असे नमूद केले आहे. त्यामुळे या ३६६ कैद्यांनी हे उपोषण सुरू केले आहे. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी तातडीने सर्व कैद्यांची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे आदेश वाचून दाखविले. तुरुंग अधिकारी नौशाद शेख, सीताराम भोकरे, महादेव खेरगे यांनीही कैद्यांची मनधरणी केली; परंतु उपयोग झाला नाही. शेवटी साळी यांनी वैद्यकीय अधिकारी परशुराम नागदरवाड यांना बोलावून कैद्यांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Prisoners Fasting In Paithan Prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.