कैद्यांनी बनविलेल्या ‘एलईडी’ने कारागृहे उजळली
By admin | Published: October 13, 2016 05:21 AM2016-10-13T05:21:04+5:302016-10-13T05:21:04+5:30
मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांमुळे राज्यातील निम्मी कारगृहे उजळून निघाली आहेत. ब्रँडेड कंपन्यांपेक्षाही हे दिवे सरस असल्याने
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांमुळे राज्यातील निम्मी कारगृहे उजळून निघाली आहेत. ब्रँडेड कंपन्यांपेक्षाही हे दिवे सरस असल्याने मागणी वाढत असून, आता दुसरे युनिटही सुरू करण्यात आले.
राज्यातील कारागृहांमध्ये बंदीसुधारणा व पुनर्वसनांंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर वर्धा येथील ‘एमगिरी’च्या पुढाकाराने अमरावती कारागृहात दीड वर्षांपूर्वी एलईडी दिवे निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रारंभी १० बंदीजनांनी एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. बंदीजनांच्या हातून तयार होणारे हे दिवे ब्रँडेड कंपन्यांना मागे टाकणारे ठरले. परिणामी, राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांनी या दिव्यांचा पुरवठा राज्यभरातील कारागृहांत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यभरातील निम्मी कारागृहे इथल्या कैद्यांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांनी उजळली आहेत.
या एलईडी दिव्यांना असणारी वाढती मागणी लक्षात घेऊन, आता दुसरे युनिट निर्माण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंदीजनांनी तयार केलेले विविध साहित्य, वस्तूंचे प्रदर्शन १३ आॅक्टोबर थेट मंत्रालयात भरविले आहे. त्यामध्ये येथील एलईडी दिवेही ठेवले जाणार आहेत. (प्रतिनिधी)