नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी 

By admin | Published: July 8, 2016 02:40 PM2016-07-08T14:40:09+5:302016-07-08T14:43:14+5:30

नागपूर कारागृहातील कैद्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यात भाईगिरी करणा-या एका कैद्याला दोघांनी बदडले.

Prisoners in Nagpur Central Jail | नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी 

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी 

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. ८ - नागपूर कारागृहातील कैद्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यात भाईगिरी करणा-या एका कैद्याला दोघांनी बदडल्यामुळे त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. ५ जुलैला रात्री घडलेल्या या घटनेची माहिती शुक्रवारी दुपारी उघड झाल्यानंतर उलटसुलट चर्चेला उधान आले. बलरामसिंग चव्हाण असे जबर जखमी झालेल्या कैद्याचे नाव असून, तो एका खून प्रकरणाचा आरोपी आहे. हाणामारीत सहभागी असलेल्या अन्य दोन कैद्यांची नावे मुन्ना नागपुरे आणि जांभूळकर अशी आहे. 
 
मंगळवारी सायंकाळी ६.३० नंतर कारागृहाच्या बरॅक बंद झाल्या. त्यानंतर रात्री ७.३० च्या सुमारास  नागपुरे जेवण करीत होता. तर, बाजुला जांभूळकर साफसफाई करीत होता. हे दोघेही कैदीच आहेत. मात्र, त्यांचा गुन्हा आणि शिक्षा कमी असल्याने तसेच वर्तन बरे असल्याने नागपुरेकडे अन्य कैद्यांवर लक्ष ठेवण्याची (मॉनिटर) आणि जांभूळकरकडे स्वच्छता कर्मचा-याची जबाबदारी आहे. जांभूळकरने चटई झटकल्यामुळे नागपुरे चिडला. त्यामुळे या दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. तेवढ्यात बाजूला असलेला चव्हाण याने मध्ये पडून दोघांनाही नाहक शिवीगाळ केली. चव्हाण नेहमीच भाईगिरी करीत असल्याने या दोघांनी आपसातील वाद सोडून चव्हाणला ताकिद दिली. भाईगिरी करणा-या चव्हाणने त्यांच्यावर हात उगारताच नागपुरे आणि जांभूळकरनेही चव्हाणला बदडणे सुरू केले. त्याची बेदम धुलाई सुरू असताना बाजूचे कैदी आणि रक्षक धावले. त्यांनी हा वाद सोडवला. दरम्यान, बेदम मार बसल्याने चव्हाणला वेदना होऊ लागल्या. गुरुवारी त्याने कारागृह प्रशासनाकडे छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे त्याला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर या प्रकाराचा बोभाटा झाला. तथापि, कुणाकडूनही पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती नाही. 

Web Title: Prisoners in Nagpur Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.