राज्यातील कैद्यांना पॅरोल, फर्लाे नाही!
By admin | Published: October 14, 2016 02:18 AM2016-10-14T02:18:10+5:302016-10-14T02:20:13+5:30
दहशतवादी कृत्य, दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, अमली पदार्थांची तस्करी यासह बलात्कार, खून यांसारख्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोल आणि फर्लोची सुट्टी न देण्याचा निर्णय
सचिन राऊत / अकोला
दहशतवादी कृत्य, दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, अमली पदार्थांची तस्करी यासह बलात्कार, खून यांसारख्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोल आणि फर्लोची सुट्टी न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा फटका राज्यभरातील विविध कारागृहांतील साडेपाच हजारांहून कैद्यांना बसणार आहे.
कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना, मुलगा-मुलीचा विवाह, जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू यासारख्या कारणांमुळे कैद्यांना पॅरोल आणि फर्लो या रजा मंजूर करण्यात येतात. मात्र, गंभीर गुन्ह्यांतील कैदी सुट्टी संपल्यावर कारागृहात परतत नसल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अकोल्यात गेल्या सहा महिन्यांत अशी पाच प्रकरणे उघडकीस आली असून, हे कैदी अमरावती आणि नागपूर कारागृहातून सुट्टी घेतल्यानंतर परतच गेले नव्हते, त्यामुळे कैद्यांना दिल्या जाणाऱ्या या सुट्ट्यांबाबत सरकारने धोरण आणखी कडक केले आहे. त्यामुळे राज्यातील कारागृहामध्ये गंभीर गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या पाच हजार ८०० कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फर्लोची सुट्टी मिळणार नाही.