दोन दिवसांत तिढा सुटेल-पृथ्वीराज चव्हाण
By admin | Published: September 22, 2014 09:24 AM2014-09-22T09:24:17+5:302014-09-22T09:37:13+5:30
आघाडीसंदर्भात अजूनही चर्चा सुरूच आहे. असे असले तरी दोन दिवसांत आघाडीचा तिढा सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिली.
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. आघाडीसंदर्भात अजूनही चर्चा सुरूच आहे. असे असले तरी दोन दिवसांत आघाडीचा तिढा सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिली.
जनलोक आणि आधार सामाजिक सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री चव्हाण यांचा आज नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी कराड दक्षिण मतदारसंघातील मुंबई, नवी मुंबईत राहणाऱ्या रहिवाशांचा मेळावाही झाला. आपण दक्षिण कराडमधूनच विधानसभेची निवडणूक लढविणार असून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणून गेल्या पावणे चार वर्षात राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. मागील अनेक वर्षांपासून विकासापासून दुर्लक्षित राहिलेल्या दक्षिण कराडसह सातारा जिल्ह्यातील गावागावांचा विकास घडवून आणला. कराडमधून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. त्यामुळे आमदारकीही येथूनच लढविण्याचा आपण निर्धार केला आहे. त्यामुळे स्वत:ची निवडणूक समजून कामाला लागा, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
पहिली यादी आज
राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका अद्यापि स्पष्ट झालेली नाही. असे असले तरी उद्यापर्यंत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.