पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानात तथ्य असू शकतं; भाजपाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 10:23 AM2020-01-20T10:23:06+5:302020-01-20T10:25:56+5:30
शिवसेनेने यावेळीच नाही, तर 2014मध्येसुद्धा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडी करून सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता
मुंबईः शिवसेनेने यावेळीच नाही, तर 2014मध्येसुद्धा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडी करून सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आले. पृथ्वीराज चव्हाणांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपानंही या सर्व प्रकरणावरून पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत जबाबदार आणि मोजून मापून बोलणारी व्यक्ती आहेत. आपण काय बोलतो आहोत याचं त्यांना नीट भान असतं. उचलली जीभ लावली टाळ्याला हा प्रकार त्यांच्या बाबतीत होत नाही. ते जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करतात ते गंभीरपणेच घेतलं पाहिजे, असं भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीकडे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकांच्या नंतरच्या घडामोडी मलासुद्धा बऱ्यापैकी माहीत आहेत. त्यांच्या विधानामध्ये तथ्य असू शकतं एवढंच मी सांगतो. त्यावेळी चर्चा होती, पण या तीन पक्षांची खिचडी पकली नाही. आता ती खिचडी पकली.
संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की लोकसभा निवडणुकांच्या आधीपासून आम्ही चर्चा करत होतो. त्यामुळे रोज बोलणाऱ्या संजय राऊतांचं विधान आणि कमी बोलणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचं विधान एकमेकांना पूरक आहे. आम्ही मैत्री आणि श्रद्धेवर विश्वास ठेवतो, असंही ते म्हणाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीनं शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिलेला नव्हता, असंही राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी स्पष्ट केलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती उघड केली होती. भाजपाविरोधात निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली होती. त्यावेळीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव दिला होता. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करून भाजपाला सत्तेतून दूर करावे, असा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मी फेटाळून लावला होता.'' 2014 नंतर परिस्थिती खूप बदलली आहे. भाजपाने मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी केली. एकहाती सत्ता मिळावी व विरोधी पक्ष संपावेत यासाठी भाजपाने प्रयत्न केले. अशा परिस्थिती भाजपाकडे पुन्हा सत्ता गेली असती तर राज्यातील लोकशाही संपुष्टात आली असती. म्हणूनच मी पर्याची सरकारची कल्पना मांडली. तसेच भाजपा आणि शिवसेनेत तीव्र मतभेद झाल्यावर ते प्रत्यक्षात यावे यासाठी पुढाकार घेतला. माझ्या या कल्पनेला सुरुवातीला विरोध झाला. मात्र मी आग्रह कायम ठेवला. सर्व आमदारांशी बोललो. अल्पसंख्याक नेत्यांशी चर्चा केली. भाजपा आपला नंबर एकचा शत्रू आहे आणि त्याला रोखणे गरजेचे आहे हे सर्वांना पटवून दिले, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.