खासगी व अभिमतचा मागविला लेखाजोखा
By Admin | Published: August 25, 2016 05:09 AM2016-08-25T05:09:40+5:302016-08-25T05:09:40+5:30
वैद्यकीय महाविद्यालयांना प्रवेश शुल्कासह इतर शुल्क व तेथील सोयीसुविधाचा लेखाजोखा वैद्यकीय शिक्षण संचालनालयासमोर मांडावा लागणार आहे.
पुणे : राज्यातील खासगी व अभिमत विद्यापीठांशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांना प्रवेश शुल्कासह इतर शुल्क व तेथील सोयीसुविधाचा लेखाजोखा वैद्यकीय शिक्षण संचालनालयासमोर मांडावा लागणार आहे. याबाबत विभागाकडून सर्व संबंधित महाविद्यालयांची शुक्रवारी बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी सर्व माहिती घेऊन येण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्य शासनाकडून यावर्षीपासून खासगी व अभिमत विद्यापीठांतील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘नीट’मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. यावर्षी पहिल्यांदाच खासगी व अभिमतची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने राबविली जाणार आहे. राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षामार्फत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही कक्षाकडून प्रसिध्द करण्यात आले आहे. खासगी व अभिमतसाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून पसंती क्रम अर्ज भरून घेतले जाणार आहेत. परंतु सध्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे संबंधित महाविद्यालयांची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. त्याअनुषंगाने विभागाने येत्या शुक्रवारी मुंबईत सर्व संबंधित महाविद्यालयांची बैठक बोलावली आहे.
>३८,२२५ अर्ज
खासगी व अभिमत विद्यापीठांतील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी एकूण ३८ हजार २२५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये खासगीसाठी २० हजार ५७७ तर अभिमतसाठी १७ हजार ६४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी दोन्हीसाठी स्वतंत्रपणे अर्ज मागविण्यात आले होते. बुधवारी अर्ज करण्यासाठी अखेरची मुदत होती. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. प्राप्त अर्जांच्याआधारे २७ आॅगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. राज्यातील आठ अभिमत विद्यापीठांशी संलग्न १० महाविद्यालयांच्या एमबीबीएसच्या सुमारे १५०० आणि खासगीच्या एमबीबीएसच्या सुमारे १७०० आणि बीडीएसच्या सुमारे ४५० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. निश्चित प्रवेश क्षमता काही दिवसांत संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.
- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण