कोल्हापूर-गगनबावडा रोडवर खासगी बसला आग, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 07:22 AM2017-11-24T07:22:01+5:302017-11-24T15:00:31+5:30

कोल्हापूर- गगनबावडा रोडवरील लेंघे गावाजवळ एका बसला अचानक आग लागली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

A private bus fire on Kolhapur-Gaganbawda road, the death of both | कोल्हापूर-गगनबावडा रोडवर खासगी बसला आग, दोघांचा मृत्यू

कोल्हापूर-गगनबावडा रोडवर खासगी बसला आग, दोघांचा मृत्यू

Next

कोल्हापूर- गगनबावडा रोडवरील लेंघे गावाजवळ एका बसला अचानक आग लागली आहे. या अपघातात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बस चालकाच्या प्रसंगावधानानं इतर 18 प्रवाशांचा जीव बचावला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसच्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कळे पोलिसांनी तात्काळ जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. 

शुक्रवारी (24 नोव्हेंबर) पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास लोंघे गावातील महादेव मंदिराजवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीनं दाखल झालं होतं व अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या घटनेत 2 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.  

मृतांची पटली ओळख

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर लोंघे गावानजीक बसने पेट घेऊन पुण्यातील दोन प्रवाशांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. बंटी राज भट (वय 24, हडपसर-पुणे), विकी मदन भट (वय 24,  हडपसर-पुणे) अशी मृतांची नावं आहेत.  हे दोघेही कलाकार होते व ते पुण्यातील प्रसिद्ध पंजाबी ढोल-ताषा पथकामध्ये काम करीत होते.

बसमध्ये एकूण 22 प्रवासी होते. बंटी आणि विकी बसमधील 19-20 या सीटवर झोपले होते. या दुर्घटनेबाबत बंटी व विकीचा नातेवाईक चिंटू भटनं सांगितले की,  मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास बस चालक बाहेरुन ओरडत असल्याचे कानावर पडताच मी उठलो. पाहतो तर बसमध्ये धूर पसरला होता. काय झाले हे समजत नव्हते. आजूबाजुच्या सीटवर लहान मुले होती. त्यांना बाहेर घेऊन आलो. बसचा पाठीमागील दरवाजा लॉक झाल्याने पुढच्या दरवाजाने बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. बसमधील आम्ही 20 जण बाहेर आलो. आजूबाजूला बंटी व विकी दिसत नव्हते. त्यांना बाहेरुन आम्ही आवाज देत होतो. संपूर्ण बसला  आगीने वेढा घातल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. डोळ्यासमोर चुलत भाऊ बंटी व नातेवाईक विकीचा मृत्यू झाल्याचे चिंटू भट यांनी सांगितले. 

भट कुटुंबीय शोकाकुल
पुणे-हडपसर मध्ये ‘पंजाबी ढोल-ताषे सर्व्हिसेस’ नावाचा प्रसिद्ध कलाकारांचा ग्रुप आहे. या ग्रुपला गोव्यामध्ये कार्यक्रमाचे निमंत्रण आले होते. त्यासाठी मृत बंटी भट, विकी भट यांचेसह चिंटू भट, नाशिर खान, विनोद भट, सचिन भट, अजय भट, सुनिल सासे, महेश घोरपडे यासह बारा जणांचा ग्रुप ढोल-ताशे घेऊन 20 नोव्हेंबर रोजी गोव्याला गेले. कार्यक्रम आवरुन ते पुण्याला जाण्यासाठी गुरुवारी रात्री आत्माराम ट्रॅव्हर्लसच्या स्लीपर कोच लक्झरी बसने येत होते. कोल्हापूर-गगनबावडा लोंघे गावानजीक मध्यरात्री तीनच्या सुमारास बसने पेट घेतला आणि दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त हडपसरमध्ये समजताच भट कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.  या दोघांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचे नातेवाईक पुण्याला रवाना झालेत. बंटी याच्या पश्चात आई-वडील, पत्नी व मुलगी तर विकीच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. 

 

Web Title: A private bus fire on Kolhapur-Gaganbawda road, the death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.