‘अग्निशामक’च्या खासगीकरणाचा घाट?

By Admin | Published: July 6, 2017 03:59 AM2017-07-06T03:59:36+5:302017-07-06T03:59:36+5:30

राज्य शासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीची मदत पोहोचविण्यासाठी आर्यन फायर्स या खासगी एजन्सीची नेमणूक केली असून

Private firefighters' jetty? | ‘अग्निशामक’च्या खासगीकरणाचा घाट?

‘अग्निशामक’च्या खासगीकरणाचा घाट?

googlenewsNext

लक्ष्मण मोरे/लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीची मदत पोहोचविण्यासाठी आर्यन फायर्स या खासगी एजन्सीची नेमणूक केली असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासह महत्त्वाच्या शहरांमध्ये मदत पोहोचविण्यात येणार आहे. महत्त्वाच्या महामार्गांवर या एजन्सीमार्फत आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचविण्यात येत आहे. एकीकडे अग्निशामक दलामध्ये अनेक पदे रिक्त असतानाही भरती प्रक्रिया राबविण्याकडे जाणिवपूर्वक काणाडोळा केला जात आहे, तर दुसरीकडे खासगी एजन्सी नेमून कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती केली जात आहे. खासगीकरणाच्या दिशेने शासनाने टाकलेले हे पहिले पाऊल असून खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप अग्निशामक दलाचे जवान आणि अधिकारी करू लागले आहेत.
आर्यन फायर्स या एजन्सीची राज्य सरकारने नुकतीच नेमणूक केली आहे. एजन्सीची ‘देवदूत’ नावाची चार वाहने पुण्यात दाखल झाली आहेत. अग्निशामक दलामार्फत कामाचे स्वरूप आणि धोरण अद्याप निश्चित न झाल्याने ही वाहने पडून आणि त्यावरील कर्मचारी बसून आहेत. पुणेकरांच्या मदतीला धावून जाण्यासाठी हे देवदूत कधी अवतणार, हा प्रश्न आहे. दुसरीकडे, खासगी एजन्सीला काम देण्यात आल्याने अग्निशामक दलाच्या जवानांमधून भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. कंत्राटी पद्धतीने जर अग्निशामक दलाचे काम सुरू झाले, तर यापुढे भरतीच होणार नाही. खासगी एजन्सीची नेमणूक करून त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी एजन्सीचे कर्मचारी अग्निशामक दलाच्या जवानांप्रमाणे समर्पित भावनेने काम करतील की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
आर्यन फायर्स या एजन्सीने राज्य शासनाच्या फायर फायटिंग कोर्स झालेल्या तरुणांना कंत्राटी पद्धतीने काम दिले आहे. ५० हजार ते एक लाखांपर्यंतचे खर्च करून उप अधिकारीपदापर्यंतचे कोर्सेस या तरुणांनी केलेले आहेत.
आता हे तरुण खासगी एजन्सीमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या भरतीचा मार्ग एक प्रकारे बंद झाला आहे. पुण्यातील एकाही बड्या अधिकाऱ्याने अगर नगरसेवकांनी विरोध केलेला नाही. याबाबत कोणताही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. काही महिन्यांपूर्वी मनपाचे अधिकारी राजेंद्र जगताप यांनी कंत्राटी पद्धतीने भरती करायची,
असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, अग्निशामक दलाच्या कामगार
संघटनेने त्यांची भेट घेऊन
त्याला विरोध केला होता. अग्निशामक दलाचे अतिवरिष्ठ अधिकारी केवळ भरतीबाबत पालिकेसोबत पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगत बोळवण
करीत आहेत. भविष्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत नेऊन खासगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे.

आर्यन फायर्सची चार वाहने १ जुलै रोजी पुण्यात दाखल झाली आहेत. येत्या १५ दिवसांत आणखी ८ वाहने दाखल होणार आहेत. या वाहनांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या वाहनांवर कंत्राटी कामगार असल्याने महापालिकेचा अग्शिमन विभाग आणि कंपनी यांमध्ये समन्वय कसा राहणार, असा प्रश्न आहे. अद्यापपर्यंत कोणाही लोकप्रतिनिधीने खासगीकरणाच्या या प्रयत्नावर भूमिका घेतली नसल्याचा आरोप दलातील कर्मचाऱ्यांनी केला आहे.

अग्निशामक दलाच्या अनेक मुलांनी शासनाचे कोर्स केलेले आहेत. त्यांची नेमणूक करण्याबाबत मात्र टाळाटाळ करण्यात आलेली आहे. पूर्वी महापालिका आयुक्त म्हणून काम केलेल्या आणि सध्या दिल्ली दरबारी सेवा बजावत असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याच्या ओळखीमधून या एजन्सीला काम देण्यात आल्याची चर्चा असून त्यामध्ये कात्रज परिसरातील ‘पंप’ व्यावसायिक सहभागी असल्याचे बोलले जात आहे.


देवदूत वाहने पडून : वापराची माहिती नाही
मनपाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून ‘देवदूत’ नावाची वाहने पुरविण्यात आली आहेत. सध्या ही वाहने कोंढवा, कात्रज, नायडू आणि एरंडवणा केंद्रांमध्ये पाच दिवसांपासून पडून आहेत. या वाहनांचा वापर नेमका कशासाठी करायचा, त्यावरील कर्मचाऱ्यांनी नेमके काय काम करायचे, त्यांची हजेरी कशी घ्यायची, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतील याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.
यासोबतच त्यांना नेमक्या कोणत्या कॉलवर पाठवायचे, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. विशेष म्हणजे, या वाहनांवर मनपाचा आणि पोलिसांचा क्रमांक देण्यात आला असून अग्निशामक दलाचा १०१ हा क्रमांकच नमूद करण्यात आलेला नाही. या बाबतीत पालिका आयुक्तांना दलाकडून अद्यापही अहवाल सादर करण्यात आलेला नाही.

Web Title: Private firefighters' jetty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.