खासगी रुग्णालयांची मनमानी

By Admin | Published: January 7, 2017 01:36 AM2017-01-07T01:36:11+5:302017-01-07T01:36:11+5:30

गेल्या काही वर्षांत कामशेत शहरातील खासगी दवाखाने, रुग्णालयाची संख्या वाढली आहे.

Private Hospital's Arbitrators | खासगी रुग्णालयांची मनमानी

खासगी रुग्णालयांची मनमानी

googlenewsNext


कामशेत : गेल्या काही वर्षांत कामशेत शहरातील खासगी दवाखाने, रुग्णालयाची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयाविषयीच्या तक्रारींमध्येही मोठी वाढ झाली असून, किरकोळ उपचारांसाठीही रुग्णांची मोठी लूट होते व उद्धट वागणूक मिळत असल्याची तक्रार अनेक नागरिक करत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकाळा यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार कामशेत शहरात एकूण २६ दवाखाने - रुग्णालये असून, यात १४ आंतररुग्ण विभाग (आयपीडी) व १२ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आहेत. आंतररुग्ण विभागाच्या अंतर्गत शहरात तीन अतिदक्षता विभाग (आयसीयू) आहेत. शहराच्या विस्ताराबरोबर शहरात काही वर्षांत अनेक डॉक्टर मंडळींनी व्यवसाय विस्तारला असून, शहरात मोठ्या संख्येने दवाखाने आहेत. कामशेत हे शहर असले, तरी ते ग्रामीण भागांचे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने डॉक्टर हा देवाप्रमाणेच असतो, अशी सर्वसामान्य माणसांची समजूत कायम आहे. याचाच फायदा काही व्यावसायिक डॉक्टर व दवाखाने घेत असून किरकोळ उपचारासाठीही भरमसाट बिले रुग्णांच्या माथी मारली जात आहेत. गरज नसतानाही विविध तपासण्यांच्या नावाखाली रुग्णाची आर्थिक ससेहोलपट सुरू असून, याविषयी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी जाब विचारला असता, उडवाउडवीची, उद्धट व असभ्य उत्तरे प्रतिष्ठित डॉक्टरांकडून दिली जात आहेत. (वार्ताहर)
खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराविषयी कोणी काही बोलले, तर पुढील उपचार न करता त्या रुग्णाला वाऱ्यावर सोडले जाते. शिवाय रुग्णाला काही झाल्यास आमची जबाबदारी नाही, अशी भीती दाखवली जात असल्याने रुग्ण व त्याच्या नातेवाइकांचा नाईलाज होतो. ते सर्व निमूटपणे सहन करतात.
या डॉक्टर व दवाखान्यांविषयी कोणाकडे तक्रार करायची हा मोठा प्रश्न अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पडला असून, आजाराची भीती घालून अनेक डॉक्टर व हॉस्पिटलचा सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप अनेक जागरूक नागरिक करीत आहेत.
>सेवा देणाऱ्यांचे व्यवसाय तेजीत
शहरातील अनेक मोठे दवाखाने यांचे छोटे दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, एक्स रे व सोनोग्राफी सेंटर, मेडिकल स्टोअर, अ‍ॅम्ब्युलन्स आदी सेवा पुरवणाऱ्यांशी साटेलोटे असून, त्यांच्याशी हितसंबंध सांभाळून आपापले खिसे भरले जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या सर्वांचे व्यवसाय लोकांच्या अशिक्षितपणामुळे जोरात सुरू आहेत. यात सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. शहरातील एका मोठ्या दवाखान्यात दुचाकीवरून पडलेल्या व किरकोळ खरचटलेल्या माणसाला अंगभर पट्ट्या बांधून पैसे उकळण्याच्या नावाखाली अ‍ॅडमिट करून विविध तपासण्या करून दोन दिवसांचे भरमसाट बिल त्याच्या हाती दिले. त्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्याच्या पत्नीने त्याला घरी नेण्यासाठी डॉक्टरांकडे विनवणी करून आग्रह धरला असता, संबंधित डॉक्टरने त्या महिलेला उद्धट वागणूक दिली. ‘कामशेतची माणसे काय लायकीची आहेत आम्हाला माहीत आहे. हे हॉस्पिटल आहे; लॉज नाही. कधी या कधी जा’ अशी असभ्य भाषा वापरली. या व अशा प्रकारच्या घटना शहरातील काही हॉस्पिटलमध्ये नेहमीच घडत असून, डॉक्टरांना रुग्णाच्या आजारापेक्षा त्याचा खिसा किती मोठा आहे यातच जास्त रस असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Private Hospital's Arbitrators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.