‘खासगी रुग्णालयांनीही स्वीकाराव्यात नोटा’
By admin | Published: November 10, 2016 03:55 AM2016-11-10T03:55:05+5:302016-11-10T03:55:05+5:30
मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून चलनातून रद्द झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा सरकारी रुग्णालयात आणि जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी चालणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते
मुंबई : मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून चलनातून रद्द झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा सरकारी रुग्णालयात आणि जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी चालणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक निश्चिंत होते. पण, सकाळी नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे प्रसंग काही ठिकाणी उद्भवले. काही खासगी रुग्णालयांत गोंधळाची स्थिती होती. तथापि, सायंकाळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सरकारीसह खासगी रुग्णालयांनाही ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा घेणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात जी खासगी रुग्णालये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाहीत, अशांची तक्रार करण्याचे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे उद्या (१० नोव्हेंबर) खासगी रुग्णालयात कोणाचीही अडवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एरवी चेक घेत नसले तरी सध्याच्या परिस्थितीमुळे चेक स्वीकारत असल्याची माहिती भाटिया रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजीव बौधनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. फोर्टिस रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले की, आमच्या रुग्णालयांमध्ये १००च्या नोटा स्वीकारण्यात आल्या. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी डेबिट, के्रडिट कार्डने पैसे भरले आहेत. ज्या रुग्णांना तत्काळ औषधोपाचराची आवश्यकता होती, त्यांना आम्ही उपचार दिले आहेत. पैशांसाठी कोणलाही अडवले नाही. अचानक झालेल्या निर्णयामुळे काही रुग्णांच्या नातेवाईकांसमोर पैसे भरण्याचा प्रश्न निर्माण झाला. पण, त्या रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने मदत केली. उपचार मिळतील, याकडे लक्ष देण्यात आल्याचे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. राम नारायणन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया
दाताच्या उपचारासाठी यायचे म्हणून मी सकाळी विरारहून सहा वाजता उपाशीपोटी घराबाहेर पडले. विरार स्थानकावर तिकीट काढल्यावर माझ्याकडे ५०० रुपयाची एकच नोट होती. आता दुपारी घरी पोहोचायला अडीच वाजतील. तोपर्यंत उपाशी राहावे लागेल. दातांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी सहाला घर सोडल्यावर मी आठ वाजता रुग्णालयात पोहोचले. आता १२ वाजता माझे उपचार पूर्ण झाले. डॉक्टरांनी काही तरी खाऊन घ्या आणि मग औषध घ्या, असे सांगितल्याने मी रुग्णालयाच्या कॅण्टीनमध्ये आले. पण कॅण्टीनवाल्याने स्पष्ट नकार दिल्यामुळे आता उपाशीपोटीच घरी जावे लागते आहे. घरी गेल्यावर आता खाल्ल्यावरच गोळ्या घेईन.
- मनीषा, विरार
आम्ही परभणीत राहतो. माझी पत्नी माया हिची एक नस दबली गेल्यामुळे तिचा पाय लुळा पडला. आम्हाला लहान बाळ आहे. पण माझ्या पत्नीच्या उपचारांसाठी आम्ही मुंबईला आलो. बाळ तिथेच आहे. आता माझ्याकडे ५०० रुपयांच्या नोटा आहेत. माझ्या पत्नीसाठी मला औषधे घ्यायची आहेत. पण गेल्या दोन ते तीन तासांपासून मी औषधांची दुकाने फिरतो आहे. मला अजूनही औषध मिळालेले नाही. सकाळी चहा-नाश्त्यासाठीदेखील पैसे नव्हते. म्हणजे ५०० रुपयांच्या नोटा आहेत. पण त्याचा आज काहीच उपयोग नाही. आज बँकही बंद आहे. त्यामुळे आता काय करायचे, हा प्रश्नच आहे.
- प्रवीण डाके, परभणी
मला मूतखड्याचा त्रास आहे. त्यामुळे मला रोज औषध घ्यावेच लागते. आज माझे औषध संपले आहे. म्हणून मी औषधांच्या दुकानात आलो. माझ्याकडे हजारची नोट आहे. पण औषध दुकानदार ही नोट घेत नाहीत. आज बँक बंद असल्यामुळे सुटे पैसे मिळणार नाहीत. औषधांच्या दुकानात तरी या नोटा स्वीकारल्या पाहिजेत असे वाटते. पण आता औषधे कशी मिळणार हा प्रश्नच आहे.
- सुरेश कदम, वरळी
शेगावजवळील संग्रामपूर येथे राहणाऱ्या बाजीराव भाटिया यांच्या मेंदूवर जे.जे. रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. भाटिया हे श्री संत गुलाबबाबा काटेर संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून या संस्थेचे सदस्य त्यांच्याबरोबर आहेत. मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यामुळे औषधांसाठी अधिक पैसे लागतील म्हणून आम्ही २५ ते ३० हजार रुपये आमच्या बरोबर आणले आहेत. पण काल रात्रीची घोषणा आम्हाला आज सकाळीच कळली. त्या वेळी आमच्या हातात फक्त पाचशेच्या नोटा असल्याने खूप प्रॉब्लेम झाला. ओळखीच्या लोकांनी आम्हाला पैसे आणून दिल्याने आजचा दिवस जाईल. पण परत हे पैसे बदलून घेताना काय करायचे, हा प्रश्न आहेच.
- मिलिंद खेडीकर, विदर्भ