विमानतळाच्या कामाला खासगी ‘सुरक्षा’ कवच
By Admin | Published: August 23, 2016 02:39 AM2016-08-23T02:39:29+5:302016-08-23T02:39:29+5:30
विमानतळ प्रकल्पाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले असले तरी काही मुद्यावरून प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम आहे.
नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले असले तरी काही मुद्यावरून प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम आहे. असे असतानाही सिडकोने विमानतळाशी संबंधित प्राथमिक स्वरूपातील विविध कामांना गती दिली आहे. या कामासाठी येणाऱ्या साहित्यांचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रधारी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विमानतळ प्रकल्पाच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय स्थलांतर करणार नाही, किंबहुना पुनर्वसन पॅकेजही स्वीकारले जाणार नाही, असा पवित्रा दहा गावातील प्रकल्पबाधितांनी घेतला आहे. परंतु त्यानंतरही सिडकोने विमानतळ प्रकल्पांशी संबंधित विविध प्रकारची स्थापत्यविषयक कामे हाती घेतली आहेत. यात जमिनीचे सपाटीकरण करणे, उलवा टेकडीची उंची कमी करणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी सुमारे १७00 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. ही कामे विविध ठेकेदारांना विभागून देण्यात आली आहेत. अलीकडेच यापैकी अनेक कामांना सुरुवातही करण्यात आली आहे. या कामांसाठी संबंधित ठेकेदारांकडून प्रकल्पस्थळावर यंत्रसामग्री व इतर साहित्य आणण्यात आले आहे. परंतु स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा संभाव्य विरोध लक्षात घेवून या ठेकेदारांत सुरक्षेच्या विषयावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका हाती घेतलेल्या कामांना बसण्याची शक्यता गृहीत धरून सिडकोने या कामांवर ३४ शस्त्रधारी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. याद्वारे सिडको दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
सिडकोने हे आरोप फेटाळून लावले आहेत. शेकडो कोटींची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठी ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री व साहित्य कामाच्या जागेवर आणून टाकले आहे. ही यंत्रसामग्री व साहित्यांचे संरक्षण करणे हाच यामागचा एकमेव उद्देश असल्याचा दावा सिडकोच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर संवाद सुरू आहे. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनीही सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>उलवा टेकडीची उंची कमी करणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी सुमारे १७00 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. ही कामे विविध ठेकेदारांना विभागून देण्यात आली आहेत. अलीकडेच यापैकी अनेक कामांना सुरुवातही करण्यात आली आहे.