खाजगी सर्व्हेत ३८ जंक्शन कोंडीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2016 03:11 AM2016-07-19T03:11:21+5:302016-07-19T03:11:21+5:30

ठाणे महानगरपालिका मेड्युला सॉफट टेक्नॉलॉजी व ट्रान्सपोर्ट सिम्युलेशन सिस्टीम - स्पेन यांच्या संयुक्त विद्यमाने आकारास येणार आहे.

Private survey of 38 Junction Kondi | खाजगी सर्व्हेत ३८ जंक्शन कोंडीचे

खाजगी सर्व्हेत ३८ जंक्शन कोंडीचे

Next


ठाणे : शहरातील वाहतुकीचे सर्वेक्षण करून त्यावर आधारित तिचे व्यवस्थापन करण्यासाठीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाणे महानगरपालिका मेड्युला सॉफट टेक्नॉलॉजी व ट्रान्सपोर्ट सिम्युलेशन सिस्टीम - स्पेन यांच्या संयुक्त विद्यमाने आकारास येणार आहे. या संस्थेने शहरातील ३०० जंक्शनचा सर्व्हे केला असून सर्वच जंक्शनवर वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. परंतु, त्यातही शहराच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ३८ जंक्शनबाबत त्यांनी सिग्नल यंत्रणेपासून ते थेट तेथील वाहतूकबदलापर्यंतचे फेरबदल सुचवले आहेत. याशिवाय, शहरात मोठी गृहसंकुले आणि मॉलच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणाही सहजासहजी पोहोचू शकत नसल्याचे निरीक्षणही त्यांनी या सर्व्हेत नोंदवले आहे.
शहरातील अरुंद रस्ते, पार्किंगचा उडालेला बोजवारा आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेऊन या सर्वांचे म्हणजेच वाहतुकीचे भविष्यात योग्य नियोजन करण्यासाठी पालिकेने हे सर्वेक्षण मागील दोन वर्षांपासून सुरू केले होते. त्यानुसार, सध्याच्या वाहतुकीबरोबरच भविष्यात नव्याने होणारे रस्ते, उड्डाणपूल नवनवीन येऊ घातलेले प्रकल्प आदींच्या दृष्टीने वाहतुकीचे आणि नागरी सुविधांचे नियोजन कसे असावे, याचे निरीक्षण या सर्व्हेत नोंदवले आहे.
शहरात मोठे मॉल्स आणि गृहसंकुले असून या ठिकाणी १०० पेक्षा अधिक वाहने पार्किंग केली जातात. मात्र, वाहनांना आतमध्ये येण्याचा तसेच बाहेर जाण्याचा मार्ग वाहतुकीचे नियोजन लक्षात घेऊन तयार करण्यात न आल्यामुळे मुख्य रस्त्यावरदेखील वाहतूककोंडी होते. भविष्यात ती टाळण्यासाठी या सर्व रहिवासी आणि वाणिज्य स्वरूपातील इमारतींनी वाहतुकीचे नियोजन लक्षात घेऊनच आपल्या प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गाचे नियोजन करण्याची गरज आहे. यासाठी ठराव करण्याचादेखील विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चांगली सेवा देण्यास ठाणे परिवहन सेवा कमी पडल्याने त्याचा फायदा खाजगी वाहतूकदारांनी उठवला असून त्यामुळेदेखील शहराच्या वाहतूककोंडीत भर पडली आहे.
मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी सर्व्हिस रोड तयार केले आहेत. अंतर्गत वाहतुकीसाठी त्यांचा वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी होणार नाही. मात्र, शहराबाहेर जाणारी वाहनेदेखील याच रोडचा वापर करत असल्याने त्यांना मुख्य रस्त्यांचे स्वरूप आल्याने त्यांचा उद्देश फसला आहे.
या संस्थेच्या माध्यमातून शहरातील ३०० जंक्शनच्या व्हिडीओ शूटिंगच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात आला. यात जंक्शनच्या ठिकाणी नव्याने येणाऱ्या सोयीसुविधा, सध्याची परिस्थिती या बाबी लक्षात घेऊन काही बदल सुचवून यासाठी एक बेस मॉडेल तयार केले आहे.
त्यानुसार, नव्याने निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या ठिकाणी पार्किंग कसे असावे, इमारती आणि मॉलमध्ये आगमन-निर्गमन कसे असावे, सध्याच्या स्थितीत येथे काही बदल करता येऊ शकतात का, फायर ब्रिगेडची गाडी अगदी शेवटच्या संकुलापर्यंत जाण्यासाठी रस्ते कसे असावेत, आदींचा यात अंतर्भाव केला आहे.
ठाणे स्थानक परिसरात पादचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेदेखील या परिसरात वाहतूककोंडी होते. ती टाळण्यासाठी पादचाऱ्यांना चालण्यासाठीदेखील योग्य नियोजन होण्याची गरज असल्याचे निरीक्षण या सर्व्हेमध्ये नोंदवण्यात आले आहे.
>३०० जंक्शनची केली पाहणी
या संस्थेने ३०० जंक्शनचा सर्व्हे केला असला तरी शहरातील तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, कळवानाका, कॅसल मिल आदींसह घोडबंदरचे काही महत्त्वाचे जंक्शन, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, हिरानंदानी, वागळेचे काही जंक्शन आदींसह इतर अशा प्रकारे ३८ जंक्शनच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणेत काही बदल करता येऊ शकतात का, सर्व्हिस रोडला वाहतूक वळवणे, डिव्हायडर, ओपनिंग आणि एण्ड लेव्हलवर काही बदल, येथे होणारे अपघात टाळण्यासाठी काही बदल, नो एण्ट्री, रस्त्यांची रुंदी वाढवणे, चौक रुंद करणे आदींमध्ये महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. शहरांतर्गत वाहतुकीचे डिजिटल नेटवर्किंग तयार केले आहे. शहरात नवीन रस्ता किंवा उड्डाणपूल तयार करताना या डिजिटल नेटवर्किंगचा उपयोग होणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प उभारताना वाहतुकीच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

Web Title: Private survey of 38 Junction Kondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.