'...पण आदित्य साहेबांना आवडलं नाही'; चंद्रकांत खैरेंनी आडून-आडून बरंच सुनावलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:07 PM2020-03-13T12:07:13+5:302020-03-13T12:07:52+5:30
‘आता ती बाई चांगलं काम करेल. हिंदी-इंग्रजी बोलते, हरकत नाही. मला नाही पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मात्र आदित्य साहेबांना आवडलं नाही’ या शब्दांत त्यांनी निशाणा साधला. खैरे म्हणाले, मी बाळासाहेबांबरोबर अनेक वर्षे काम केले आहे.
मुंबई : शिवसेनेने राज्यसभेच्या एका जागेसाठी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमदेवारी दिली आहे. या जागेसाठी इच्छुक असलेले औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘आता ती बाई चांगलं काम करेल. हिंदी-इंग्रजी बोलते, हरकत नाही. मला नाही पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मात्र आदित्य साहेबांना आवडलं नाही’ या शब्दांत त्यांनी निशाणा साधला. खैरे म्हणाले, मी बाळासाहेबांबरोबर अनेक वर्षे काम केले आहे.
उद्धवजींबरोबरही काम करीत आहे. त्यांना वाटते की नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. मी स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिक राहील. संधी मिळाली असती तर लढायला बळ मिळालं असतं. मला खूप ऑफर होत्या, पण इकडेतिकडे कुठेही गेलो नाही. बाकीचे येतात आणि जातात. किती जण आले आणि गेले या शब्दात खैरे यांनी निष्ठावंतांपेक्षा शिवसेनेत उपऱ्यांना उमेदवारी दिल्याची टीका एक प्रकारे केली. निवडणूक तज्ज्ञ प्रशांत किशोर यांची मदत शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या वेळी घेतली होती. त्यांच्यावरही खैरे घसरले. अशांना आणून काय साधले, असा सवालही त्यांनी केला.
> कोण आहेत चतुर्वेदी?
४१ वर्षीय प्रियंका चतुर्वेदी या मूळ मुंबईकर आहेत. त्या आधी काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. २०१० मध्ये त्या काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या. ११ महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या दोन एनजीओंच्या ट्रस्टी आहेत आणि त्या माध्यमातून बालकांचे शिक्षण आणि महिला सबलीकरणाचे काम केले जाते. त्या उत्तम स्तंभलेखिकाही आहेत.