प्रियंका राऊतनं संघर्षग्रस्त परिस्थितीत मिळवले 77 टक्के
By admin | Published: May 25, 2016 07:34 PM2016-05-25T19:34:35+5:302016-05-25T19:34:35+5:30
विद्यार्थिनी प्रियंका संतोष राऊत हिच्या संघर्षग्रस्त प्रवासातील एका टप्प्यावर बुधवारी यशाची मोहोर उमटली.
राकेश घानोडे
नागपूर, दि. 25 - पालकांची शिकविण्याची क्षमता नसतानाही जीवन फुलविण्याच्या मार्गावर चालत सुटलेली आर. एस. मुंडले धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका संतोष राऊत हिच्या संघर्षग्रस्त प्रवासातील एका टप्प्यावर बुधवारी यशाची मोहोर उमटली. प्रियंकाने इयत्ता बारावीची परीक्षा ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. यापुढे ती बी.ए. पदवीला प्रवेश घेणार असून त्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे तिचे लक्ष्य आहे. प्रियंका कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेत आहे हे पाहिल्यास, तिला सलाम करण्यासाठी हात आपोआपच वर उठतात.
प्रियंकाचे वडील मोटरसायकल दुरुस्तीचे, तर आई घरकाम करते. त्यांना प्रियंकासह एकूण सहा मुली आहेत. प्रियंका दुसऱ्या क्रमांकाचे अपत्य. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीचे शिक्षण दहावीपूर्वीच सुटले. दोन बहिणी शिक्षणासाठी मामाकडे राहात आहेत. प्रियंकाचे वडील मूळचे गोंदिया जिल्ह्यातील. उदरनिर्वाहासाठी नागपुरात आल्यानंतर काही दिवसांनी ते मूळ गावात परत गेले. त्यावेळी प्रियंका दहावीला होती. तिला कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सुरूच ठेवायचे होते. परिचितांनी मदत केल्यामुळे ती बाजारगावातील आश्रमशाळेत राहिली. तेथून तिने दहावीची परीक्षा ७२ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. आश्रमशाळेत ती ह्यटॉपरह्ण होती. यानंतर पुढील शिक्षणासाठी तिला भावणा जैन यांनी सहकार्य केले. इयत्ता अकरावी पूर्ण होतपर्यंत ती जैन यांच्याकडे राहिली. तिचा इयत्ता बारावीच्या शिक्षणाचा खर्च जॉली थॉमस यांनी उचलला. थॉमस यांच्याकडे राहून तिने इयत्ता बरावीचा महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला.
प्रियंकासोबत बोलल्यानंतर तिची जिद्द किती बळकट आहे हे जाणवते. परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही तिने प्रयत्नांचा हात कधीच सोडला नाही. प्रयत्न तेथे परमेश्वर असल्याचे ती म्हणते. विविध अडचणींवर मात करून मिळणाऱ्या वेळात ती केवळ अभ्यासच करीत होती. अभ्यासास शांत वातावरण मिळण्यासाठी ती मध्यरात्रीनंतर उठायची. तिचा हा ध्यास पुढेही कायम राहील हे नक्की. प्रियंका आता एक खासगी जॉब करीत आहे. तिने राहण्यासाठी भाड्याची खोली घेऊन स्वतंत्र होण्याच्या दिशेने हिंमतीने पुढे पाऊल टाकले आहे. ती खोलीचे भाडे देत असली तरी भोजनाचा खर्च मात्र तिची अम्मा म्हणजे जॉली थॉमस याच करीत आहे. तिने बारावीच्या यशाचे श्रेय अम्मासह सर्व शिक्षकांना दिले.