पानसरे हत्येपूर्वी विनयची टेहळणी

By admin | Published: September 9, 2016 05:29 AM2016-09-09T05:29:05+5:302016-09-09T05:29:05+5:30

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक असलेला सातारा जिल्ह्यातील उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील संशयित व फरार विनय बाबूराव पवार

Priya's murder | पानसरे हत्येपूर्वी विनयची टेहळणी

पानसरे हत्येपूर्वी विनयची टेहळणी

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक असलेला सातारा जिल्ह्यातील उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील संशयित व फरार विनय बाबूराव पवार याने कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात टेहळणी केल्याचे तसेच त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
पानसरे हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला गुरुवारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणीस्तर न्यायाधीश यू. बी. काळपागर यांच्या न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजी राणे व तपास अधिकारी तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी हा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने तावडेच्या पोलीस कोठडीची मुदत १६ सप्टेंबरपर्यंत वाढविली. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तावडेवर सीबीआयने बुधवारी पुणे येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पानसरे हत्याप्रकरणातील तावडेचे पुरवणी दोषारोपपत्र तीन महिन्यांत तपास अधिकारी सादर करणार आहेत.


पाच औषधे व सात बिले
आरोपी तावडे याच्या झडतीत सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमातून जप्त केलेल्या साहित्यांची यादी न्यायालयास सादर करण्यात आली. त्यामध्ये तावडे याच्याकडे ३१४० रुपयांची वेगवेगळ्या पाच प्रकारची चेतासंस्थेवर प्रभाव करणारी (सीएनएस - सेंट्रल नर्व्हस सिस्टीम) शेड्युल एच व एच-१ औषधे, वेगवेगळ्या औषधांची सात बिले आणि सुरुवातीची एक ते चौदा पाने फाडलेल्या एका आवक-जावक रजिस्टरचा समावेश आहे.

दोषारोपपत्र दाखल नाही
पानसरे हत्येप्रकरणी समीर विष्णू गायकवाड (आरोपी क्रमांक १) यास १६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात १४ डिसेंबर २०१५ ला दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाच्या मंजुरीने भारतीय दंड संहितेच्या कलम १७३ (८) प्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
या खून खटल्यात वीरेंद्र तावडे याला एसआयटीने पानसरे खून प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून २ सप्टेंबर २०१६ ला अटक केली आहे. त्याच्यावर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची मुदत त्यानंतर ९० दिवस असते, परंतु तावडे याच्यावर गुरुवारीच आरोपपत्र दाखल करण्यात आल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्याने गोंधळ उडाला.
गुरुवारी तावडे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने ती वाढवून घेण्यासाठीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर कोणतेही दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले नसल्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी स्पष्ट केले.


नार्कोटिक
औषधे कशाला?
तावडे याच्याकडे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमात नार्कोटिक औषधे मिळाली आहेत. तो व्यवसायाने डॉक्टर असून त्याच्याकडे आश्रमातील वैद्यकीय विभागाची जबाबदारी होती. आश्रमाच्या झडतीवेळी त्या ठिकाणी मानवी चेतासंस्थेवर परिणाम करणाऱ्या शेड्युल एच व एच-१ प्रकारच्या ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, असे निदर्शनास आले.

पत्नीस चक्क तीर्थ म्हणून दिले सायकिअ‍ॅट्रिक औषध
पोलीस कोठडीत असताना तावडे व त्याच्या पत्नीची रुजवात घालण्यात आली. गोवा आश्रमात डॉ. आशा ठक्कर व तावडे याच्या पत्नीची भेट झाली होती. डॉ. ठक्कर यांनी तुमच्या पत्नीस सायकिअ‍ॅट्रिक औषधाची गरज असल्याचे त्याला सांगितले. तेव्हा तावडेने साधिका सुदेशणा पिंपळे यांच्याकरवी पत्नीला तीर्थ म्हणून सायकिअ‍ॅट्रिक औषधाचा नियमित डोस दिल्याचे स्पष्ट झाले.संस्थेसाठी तो स्वत:च्या मुलीची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे नव्हता.

साडविलकरकडे आलेले दोघेजण पवार, अकोलकर
वीरेंद्र तावडेचा साथीदार विनय पवार हा २००९ च्या मडगाव बॉम्बस्फोटापासून फरार आहे. तावडेने विनय पवार व संशयित सारंग अकोलकर या दोघांना कोल्हापुरातील साक्षीदार संजय साडविलकर यांच्याकडे दोन पिस्तुले (अग्निशस्त्र) तयार करून घेण्यासाठी पाठविले होते.

गोविंद पानसरे यांच्यावर ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्या परिसरात गोळीबराच्या घटनेपूर्वी काही वेळ अगोदर व घटनेच्या अगोदरच्या दिवशी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी काही व्यक्तींना संशयितरीत्या घुटमळताना
पाहिले होते. त्यामध्ये विनय पवारचा समावेश होता.

साक्षीदाराने हे तपासादरम्यान, त्याचे छायाचित्र पाहून सांगितले आहे. यावरून संशयित तावडे याचा गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. साक्षीदार साडविलकर यांनी यापूर्वीच त्यांच्या जबाबामध्ये
तावडेच्या सांगण्यावरून दोन व्यक्ती त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर तयार करून घेण्यासाठी आल्या होत्या, असे तपासात सांगितले आहे.

Web Title: Priya's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.