अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक लांबणीवर, उद्या जाहीर होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:00 AM2018-06-10T03:00:19+5:302018-06-10T03:00:19+5:30
अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होणे अपेक्षित होते.
पुणे - अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, वेळापत्रक निश्चित करण्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने ते लांबणीवर पडले आहे. येत्या सोमवारी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय प्रवेश समितीकडून दर वर्षी लगेच अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र, यंदा वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला आहे. राज्यातील सर्वच विभागांतील अकरावीचे केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये अकरावी प्रवेश अर्जाचा भाग १ दहावीच्या निकालापूर्वी भरणे अपेक्षित होते. शुक्रवारी निकाल जाहीर झाल्यानंतर भाग २ मध्ये त्यांना निकालामध्ये मिळालेले गुण व महाविद्यालयांचा पसंती क्रमांक आदी माहिती भरायची आहे. इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांना भाग १ व भाग २ एकाच वेळी भरता येईल. त्यासाठी शहरातील मार्गदर्शन केंद्रे निश्चित करून दिली आहेत.