राज्यात पावसाची ओढ कायम राहण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 09:18 PM2018-08-09T21:18:23+5:302018-08-09T21:22:08+5:30
पुढील दोन आठवडे शेतीच्या दृष्टीने चिंताजनक राहण्याची शक्यता आहे़. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे़.
पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे़. त्यामुळे येत्या १३ आॅगस्टपासून मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली तरी महाराष्ट्रातपाऊस कमीच राहणार आहे़. पुढील दोन आठवडे शेतीच्या दृष्टीने चिंताजनक राहण्याची शक्यता आहे़. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे़.
पावसाने ओढ दिल्याने सध्या राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़. १ जूनपासून ८ आॅगस्टपर्यंत झालेल्या पावसाची तुलना करता राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़. त्यातील नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, सोलापूर, सांगली या दहा जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी पाऊस झाला आहे़. त्या गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, विदर्भातील विस्तृत भागावर पाऊस न झाल्याने पिकांची परिस्थिती गंभीर बनली आहे़.
हवामान विभागाने पुढील दोन आठवड्याचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे़. याबाबत डॉ़. ए़. के़. श्रीवास्तव यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या उपसागर व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, बिहार, पूर्व उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या परिसरात पुढील आठवड्यातील बहुतेक दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे़. पश्चिम राजस्थान, गुजरात, मराठवाडा, तेलंगणा, रायलसिमा, तामिळनाडु या परिसरात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे़.
हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत असलेल्या अंदाजाविषयी डॉ़ श्रीवास्तव म्हणाले, पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी जगातील सर्वोत्तम मॉडेलचा वापर केला जात असून हवामान विभागाकडून संपूर्ण हंगामातील चार महिन्यांचा अंदाज व्यक्त केला जातो़ .तसेच महिन्याचा अंदाज देशपातळीवर दिला जातो़. अजूनही जिल्हानिहाय पावसाचा अंदाज व्यक्त करण्याइतकी क्षमता आपल्याकडे नाही़ आपल्याकडील मॉडेलमधील ही कमतरता आहे़. हवामान विभागाने जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज १०० टक्के व्यक्त केला होता़. त्यात मॉडेलमधील त्रुटी ही ९ टक्के गृहीत धरली जाते़ .त्यानुसार देशपातळीवर ९४ टक्के पाऊस झाला आहे़. मध्य भारतात व राज्यात जुलैअखेरपर्यंत चांगला पाऊस झाला होता़. तेव्हा उत्तर भारतात जवळपास ५० टक्के पाऊस कमी होता़. आता उत्तर भारतात पाऊस होत असून मध्य भारत व राज्यात पाऊसमान कमी झाले आहे़. संपूर्ण देशभरात एकाचवेळी मॉन्सूनचा पाऊस होत नाही हे त्याचे वैशिष्टय आहे़.
मागील दोन दिवसांपूर्वी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते़.त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता़. परंतु, हा कमी दाबाचा पट्टा वेगाने राजस्थानकडे सरकल्याने राज्यात पाऊस होऊ शकला नाही़. वाऱ्याची दिशा अचानक बदल्याने राज्यात पाऊस होऊ शकला नाही आणि हवामान विभागाचा अंदाज चुकला़ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्यामुळे राज्यात विशेषत: विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे डॉ़ श्रीवास्तव यांनी सांगितले़.
राज्यात १ जूनपासून ९ आॅगस्टपर्यंत पडलेल्या पावसाची तुलना करता औरंगाबाद (-४० टक्के), जालना (-३८ टक्के), नंदूरबार (- ३६ टक्के), बुलढाणा (- ३५ टक्के), धुळे (- ३१ टक्के), जळगाव (-२४ टक्के), सांगली (-२९ टक्के), सोलापूर (- २६ टक्के), परभणी (-२१ टक्के), बीड (- २६ टक्के) या दहा जिल्ह्यांमध्ये सध्याच भीषण परिस्थिती निर्माण झाली असून अजून पुढील दोन आठवडे या भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही़ त्यामुळे तेथील परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते़.
या दहा जिल्ह्याबरोबरच लातूर (-१४ टक्के), हिंगोली (- १५ टक्के), अमरावती (- १७ टक्के), भंडारा (-११ टक्के), यवतमाळ (- ८ टक्के),नांदेड (- २), उस्मानाबाद (- ५), चंद्रपूर (-५), गडचिरोली (-७), अहमदनगर (-७), गोंदिया (- ५), वर्धा (१३) या १२ जिल्ह्यांमध्येही सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे़ .
...................
गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़.
.............
महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून शेतीच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक राहणार आहे़. कदाचित संपूर्ण आॅगस्ट महिन्यात राज्यात पाऊस कमी राहू शकतो़ विशेषत : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे़. त्यामुळे येथील परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता आहे़.