स्थलांतराचा प्रश्न जैसे थे
By admin | Published: November 3, 2016 02:42 AM2016-11-03T02:42:07+5:302016-11-03T02:42:07+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. परंतु विमानतळाच्या मुख्य गाभा क्षेत्रातील गावांतील प्रकल्पग्रस्तांकडून स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पनवेल तालुक्यातील नऊ गावे स्थलांतरित करावी लागणार आहेत. त्यामुळे या गावांतील साडेतीन हजार कुटुंबे निर्वासित होणार आहेत. त्यांचे वहाळ आणि वडघर येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. बाधित होणाऱ्या या ग्रामस्थांना त्यांच्या मूळ बांधकाम क्षेत्राच्या तीन पट क्षेत्राचा भूखंड देण्यात येणार आहे. त्याची सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. स्थलांतरित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना लवकरच प्रत्यक्ष भूखंडांचा ताबाही देण्यात येणार आहे. तसेच त्यांना अठरा महिन्यांचे घरभाडे व बांधकाम खर्चही दिला जाणार आहे. मात्र स्थलांतरासाठी प्रकल्पग्रस्तांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्यांवर सिडकोकडून अद्यापि निर्णय होणे बाकी आहे. जोपर्यंत या मागण्यांचा विचार होत नाही, तोपर्यंत स्थलांतर न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याने सिडकोची अडचण वाढली आहे. याचा फटका विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
>सिडकोचे प्रयत्न सुरूच
विमानतळ प्रकल्पाच्या मार्गातील मुख्य अडसर ठरणाऱ्या गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया जलदगतीने सुरू व्हावी, यादृष्टीने सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे स्वत:हून ग्रामस्थांच्या भेटी घेवून चर्चा करीत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या अनेक गावांना भेटी देवून त्यांनी यासंदर्भात चर्चा केली होती. आजही सिडकोच्या माध्यमातून विविध स्तरावर ग्रामस्थांशी संवाद सुरूच आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती सिडकोच्या सूत्राने दिली.