नाशिकमध्ये पूररेषेचा प्रश्न कायम
By admin | Published: May 15, 2017 10:53 AM2017-05-15T10:53:03+5:302017-05-15T10:53:03+5:30
नाशिक नदीकाठचे शहर म्हणून पुराचा धोका येणे नवीन नाही. मात्र, सध्या नदीपात्राभोवती झालेली बांधकामे, त्यामुळे पात्राचा झालेला संकोच याबाबी पुरासाठी कारणीभूत ठरतात.
Next
>ऑनलाइन लोकमत/संजय पाठक
नाशिक, दि. 15 - शहरात २००८ मध्ये आलेल्या महापुराला आता नऊ वर्षे पूर्ण होतील, तर अतिवृष्टी झाली तरी पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी शासनाच्या अंगीकृत संस्थेने दिलेल्या सूचनांचा अहवाल सादर करून तब्बल पाच वर्षे झाली आहेत. मात्र, पाच वर्षांनंतरही यातील कोणत्याही सूचनांची अंमलबाजवणी झालेली नसल्याने शहराला महापुराचा धोकाकायम आहे.
दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या काठी दुतर्फा नाशिक शहर वसले आहे. शिवाय शहरातून नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी या अन्य नद्यांही असून, त्या गोदावरी नदीलाच मिळतात. नदीकाठचे शहर म्हणून पुराचा धोका येणे नवीन नाही. मात्र, सध्या नदीपात्राभोवती झालेली बांधकामे, त्यामुळे पात्राचा झालेला संकोच याबाबी पुरासाठी कारणीभूत ठरतात. परंतु त्याचबरोबर महापालिका आणि अन्य शासकीय यंत्रणांनी नदीपात्रात केलेली कामे म्हणजेच ठिकठिकाणी असलेले बंधारे तसेच पुराच्या प्रवाहाला अवरोध ठरतील अशा प्रकारच्या उंचीवर बांधलेले पूल यामुळे पुराचा धोका अधिक आहे. २००८ मध्ये महापूर आल्यानंतर राज्यशासनाच्या सूचनेनुसार आणि महापालिकेच्या मागणीनुसार शहरात गोदावरी नदीसह अन्य सर्वच नद्यांना पूररेषा आखण्यात आली. त्याचवेळी पूररेषा आणि पर्यायाने पुराचा धोका कमी कसा होईल या दृष्टीने उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली.
त्यानुसार राज्यशासन आणि नाशिक महापालिकेच्या विनंतीवरून केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान शाळेने नाशिक शहरातील पूररेषेचा अभ्यास करून अहवाल दिला. त्यात नदीपात्रातील अवरोध हटविण्याबरोबरच अन्य अनेक सूचनाही केल्या आहेत. २०१२ मध्ये हा अहवाल शासन आणि नाशिक महापलिकेला सादर केला. परंतु आज २०१७ उजाडले तरी पुराची तीव्रता कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.
नदीपात्रात आवश्यक त्या उपाययोजनानंतर म्हणजे नदीपात्राची रुंदी न वाढविता नदीपात्रातील बंधारे काढणे, तळातील गाळ काठणे ही कामे केल्यास २५ वर्षे वारंवारीतेच्या पुरासाठी गोदावरी नदीची पूरपातळी ३.३ आणि नासर्डी नदीची पूरपातळी १.८६ मीटरने कमी होणार आहे. तसेच शंभर वर्षे वारंवारीतेच्या पुरासाठी विचार केल्यास गोदावरी नदीची लाल रेषेतील गोदावरी नदीची पूरपातळी ३.८३ मीटर आणि नासर्डी नदीची पूरपातळी २.२१ मीटरने कमी होणार आहे.
नाशिक शहराचा पुराचा धोका टळावा यासाठी २०१७ मध्ये केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान शालेने महापलिकेला विविध उपाययोजना सुचविणारा अहवाल दिला होता. त्यासंदर्भात पाच वर्षे होऊनही पुढे महापालिका प्रशासन आणि अन्य शासकीय यंत्रणांनी त्याची दखल घेतली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महापालिकेकडे अहवाल मागविला असून, तो प्राप्त झाल्यानंतर पूररेषेत येणारे पूल आणि बंधारे हटविण्यात येणार आहे. परंतु तूर्तास महापालिकेचा अहवाल अद्याप शासनाला प्राप्त झालेला नाही.- आमदार प्रा. देवयानी फरांदे
नासर्डी नदी ठरू शकते सर्वाधिक धोकादायक नदी
महिरावणी परिसरातून उगम पावणारी नासर्डी नदी तशी बारमाही नसते, परंतु पावसाळ्यात ती अधिक रौद्र रूप धारण करते. या नदीवरील पूल, सांडवे पाइपलाइन हटविण्याच्या सूचना होत्या. मात्र त्याही कागदावरच आहेत. नासर्डी नदीवरील पुलाखाली अंबड लिंकरोडवरील पुलाखालीच महापालिकेची भव्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे पुराचे पाणी वाहण्यास अवरोध निर्माण होत असल्याने ही पाइपलाइन काढून टाकावी, अशी सूचना करण्यात आली होती. परंतु सूचनाही महापालिकेने अमलात आणलेली नाही.
उंटवाडी पुलाचे स्लॅब खालील बीमची खोली जास्त असल्याने नदीपात्रात अडथळा निर्माण होऊन पुराचे पाणी नदीकाठच्या परिसरात पसरते. त्यामुळे सध्याचा फोटो कमी हटवून तेथे महत्तम पूर पातळीच्या वर पूल बांधावा, असे सूचविण्यात आले होते. परंतु त्यावरही निर्णय झाला नाही. सध्या या पुलाची अवस्था बिकट बनली आहे. परंतु तरीही पालिका प्रशासन त्याची दखल घेण्यास तयार नाही.
तिडके कॉलनीजवळ मिलिंदनगर येथे जाणाऱ्या पूल कमी उंचीवर बांधला असून, त्यामुळे पाण्याचा प्रवाहास अडथळा येत असल्याने हा पूल तोडून नवा पूल अधिक उंचीवर बांधावा, अशी सूचना होती. परंतु त्याचा अद्याप निर्णय झालेला नाही.
पखालरोड येथेही पुलास कमी स्पॅन आणि उंची आहे, तसेच वडाळारोडवरील पुलाची अशीच अवस्था असून, हे दोन्ही पूल हटवून त्या जागी उंच पूल बांधण्याची गरज आहे. अशाच प्रकारे नाशिक-पुणे महामार्गावर आणि टाकळी गावाजवळही नासर्डी नदीवर बांधलेला पूल जुना असून, कमी क्षमतेचा आहे. तोदेखील हटवून नवीन पूल बांधण्याची गरज
आहे.
या सूचनांकडे करण्यात आले दुर्लक्ष
1. ज्या भागात नदीपात्र खाली गेले आहे, तेथे नदीपात्रालगत नदीस समांतर काँक्रीट भिंत बांधण्याची सूचना करण्यात आली होती, परंतु अशा भिंतीसाठी कोट्यवधी रुपये लागतील अशी चर्चा करण्यात आली आणि पुढे अशाप्रकारची भिंत बांधण्याचा कोणताही प्रस्ताव पुढे आला नाही.
2. गोदावरी नदीवर आसाराम बापू पूल, फॉरेस्ट नर्सरीजवळील पूल आणि रामवाडी येथील पूल २० ते २५ हजार क्यूसेक विसर्गाने पाण्याखाली येत असल्याने हे पूल हटवून पूरपातळीच्या वरील बाजूस पूल बांधणे आवश्यक आहे, अशी शिफारस करण्यात आली होती, परंतु महापालिकेने अशाप्रकारचे कोणतेही पूल बांधलेले नाही.
3. गोदवरी नदीवरच आनंदवल्ली येथे सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे. हा बंधारा हटण्यिाची सूचना करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात औद्योगिक वसाहतीसाठी आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने आता गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी टाकली आहे, परंतु हा बंधाराही हटविण्यात आलेला नाही.
4. ब्रिटिशांच्या काळात असलेल्या व्हिक्टोरिया ब्रीज आणि सध्या अहल्यादेवी होळकर पूल म्हणून परिचित असलेल्या पुलाखालीच नाशिकला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर महापालिकेने या बंधाऱ्याची उंची वाढविली, परंतु गोदावरी नदीच्या प्रवाहाला हा मोठा अडथळा ठरत असल्याने तो त्वरित हटवावा, अशी सूचना करण्यात आली होती, परंतु महापलिकेने अद्यापही बंंधारा कायम ठेवला असून, त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती या वर्षी आॅगस्ट महिन्यात अनुभवयास मिळाली. त्यामुळे पूररेषेचा प्रश्न चर्चेत आला. त्यावर आत्ताच निर्णय घेण्याची गरज आहे.