‘सारथी’मध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा अडथळा : मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:27 PM2019-12-10T12:27:48+5:302019-12-10T12:47:45+5:30
‘कोपर्डीतील गुन्हेगारांना त्वरित फाशी द्यावी
पुणे : मराठा तरुणांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या सारथी या संस्थेत काही सरकारी अधिकारी खोडा घालत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला. सरकार स्थापन होण्यासाठीच्या राजकीय घाईगर्दीत या अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला असल्याचे क्रांती मोर्चाचे म्हणणे आहे.
राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर यांनी ही माहिती दिली. कुंजीर म्हणाले, ‘‘क्रांती मोर्चाच्या मागणीवरून सरकारने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रश्क्षिण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापन केली. ही स्वायत्त संस्था आहे. सरकारने दिलेल्या निधीतून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. संस्था सुरू होऊन अवघे १० महिने झालेले असताना त्यांच्याकडे मागील ३ वर्षांचा ताळेबंद मागितला. प्रशिक्षणाबरोबरच संशोधन, शिष्यवृत्ती असे उपक्रम बंद करण्याचे परिपत्रक काढले. हा सर्व प्रकार सरकारमधील काही अधिकारी जाणीवपूर्वक करत आहेत. याच उद्देशाने स्थापन झालेल्या अन्य संस्थांना मात्र प्रशासनाकडून जास्त निधी, जास्त साह्य केले जात असते.’’
कोणते अधिकारी? असे विचारले असता कुंजीर यांनी या विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, उपसचिव रवींद्र गुरव यांची नावे घेतली. मध्यंतरी सरकार तयार करण्याची राजकीय गडबड होती. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे व अन्य काही मंत्री नियुक्त झाले; मात्र मंत्र्यांना अद्याप खाती दिली गेलेली नाहीत. त्यामुळे सर्व खात्यांचा कामकाज मुख्यमंत्रीच पाहत आहेत. त्यांना कसलीही कल्पना न देता हे परिपत्रक काढले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना माहिती देणारच आहोत; पण त्याआधी या विषयाबाबत जागृती व्हावी, यासाठी ही माहिती जाहीर करत आहोत, असे कुंजीर यांनी सांगितले.
यावेळी तुषार काकडे, सचिन आडेकर, गणेश मापारी, नीलेश सांगळे, हनुमंतराव मोटे, व्यंकटेश बोडखे उपस्थित होते. सारथीबाबत घेतलेले सर्व निर्णय त्वरित मागे घ्यावेत, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लगेचच सुरू करावी, शिक्षक भरतीसाठी असलेल्या टीईटी या नव्या परीक्षेसंदर्भात असलेली ५ टक्के गुणांची सवलत राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, सर्वोच्च न्यायालयात असलेला मराठा आरक्षणाबाबतचा खटला २२ जानेवारीला सुनावणीला येणार असून, त्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांची नियुक्ती करावी अशा मागण्या या वेळी केल्या. याची दखल घेतली गेली नाही, तर मराठा क्रांती मोर्चाला पुन्हा रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.
....
‘कोपर्डीतील गुन्हेगारांना त्वरित फाशी द्यावी
मराठा क्रांती मोर्चाचे संघटन कोपर्डी बलात्कार प्रकरणावरून झाले. यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली असून त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ती लवकर निकाली काढून आरोपींना फाशी द्यावी; अन्यथा हैदराबादच्या पोलिस चकमकीसारखे प्रकरण होईल, असे या वेळी सांगण्यात आले. यावर आरोपींना असे मारण्याला तुमचे संघटना म्हणून समर्थन आहे का? या प्रश्नावर कुंजीर यांनी, आम्ही तसा विचार अद्याप केलेला नाही, असे सांगितले. जनभावना महत्त्वाची असते व न्याय मिळण्यास विलंब होऊ नये असे ते म्हणाले.