अधीक्षकांनी जाणून घेतल्या कैद्यांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2016 05:09 AM2016-08-31T05:09:09+5:302016-08-31T05:09:09+5:30
वर्षानुवर्षे तुरुंगाच्या चार भिंतींमध्ये खितपत पडलेल्या कैद्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी केला
गणेश वासनिक, अमरावती
वर्षानुवर्षे तुरुंगाच्या चार भिंतींमध्ये खितपत पडलेल्या कैद्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी केला. विविध सामाजिक संघटना आणि महिला व बालकल्याण विभागाच्या सहकार्याने सोमवारी अमरावती कारागृहात बंदी सुधार अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला. अधीक्षक ढोले यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या या अभियानामुळे कैद्यांना त्यांच्या व्यथा, वेदना मांडण्याची संधी मिळत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी पार पडलेल्या कार्यशाळेत कैद्यांना तुरुंग प्रशासनाने पाच विषयांवर बोलते केले. त्यात बंदी समस्या, कारागृह स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, मानसिक रुग्ण असलेल्या कैद्यांचे सर्वोच्च व उच्च न्यायालयात अपील तसेच वैद्यकीय उपचार या विषयांचा समावेश होता. या अभियानात सुमारे ६०० कैद्यांनी सहभाग नोंदविला.
कारागृहातील खुल्या पटांगणात कैद्यांना एकत्र आणण्यात आले आणि मनातील व्यथा नि:संकोचपणे मांडा, असे आवाहन ढोले यांनी केले. या वेळी बहुतांश कैद्यांनी नातेवाईकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी महिला-बालकल्याण अधिकारी चवरे, वऱ्हाड संस्थेचे नागदिवे, प्रमोद मेश्राम, अवेअरनेस संस्थेचे अमित शहाळकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, आदींची उपस्थिती होती.