पाचपुतेंच्या साईकृपा कारखान्याच्या लिलावाची प्रकिया सुरू
By admin | Published: October 26, 2016 12:25 AM2016-10-26T00:25:41+5:302016-10-26T00:25:41+5:30
बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया अखेर प्रशासनाने सुरू केली
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 26 - शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपये थकविल्याने माजीमंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया अखेर प्रशासनाने सुरू केली आहे. कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची थकबाकी देणी दिली जाणार आहे. कारखान्यांच्या जमिनीवर सरकारचे नाव लावण्यात आले असून, कारखान्यांची किंमत काढण्याचे आदेश श्रीगोंदा तहसीलदारांना मंगळवारी दिला आहे. बबनराव पाचपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पाचपुते यांच्या साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची बिले थकविली आहेत. थकीत देणी मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेवून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बँकेचे प्रतिनिधी, कारखान्याचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलविली़ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद़ पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे, पंजाब नॅशनल बँकेचे अनुप कुमार, साईकृपा कारखान्याचे कैलास जरे, एच़ आऱ मुंडे, चंद्रकांत गुंगे, आंदोलनाचे प्रमुख राजेंद्र देवगावकर, काँ. बाबा आरगडे, विधी सल्लागार अॅड. कारभारी गवळी, देविदास कदम आदी शेतकरी बैठकीस उपस्थित होते.
साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांची ३५ कोटींची ऊसाची बिले थकविली आहेत ती मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे़ उच्च न्यायालयाने कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची देणी देण्याचे आदेश दिला़ मात्र प्रशासानाकडून कार्यवाही होत नव्हती़ अखेर कारखान्याची विक्री करण्याच्या दिशने प्रशासनाने पावले उचलली आहेत़ त्यात बँकेचीही कारखान्याकडे थकबाकी आहे.
प्रशासनाने कारखाना उभा असलेल्या जमिनीच्या सातबऱ्यावर सरकारचे नाव लावले आहे. कारखान्याची किंमत निश्चित करण्याच्यादेखील सूचना संबंधितांना केल्या आहेत़ किंमत निश्चित करून त्यानुसार कारखान्याचा लिलाव केला जाणार आहे़ कारखाना विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांचे व्याजासकट पैसे देण्याचे अश्वासन जिल्हाधिकारी कवडे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये मिळणार पैसे
साईकृपा कारखान्याची विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सातबाऱ्यावर सरकारचे नाव लावण्यात आले असून, कारखाना ताब्यात घेतला जाणार आहे. कारखाना ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्यात येणार आहे, ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना व्याजासकट पैसे देण्याचे अश्वासन कवडे यांनी यावेळी दिले.