मिरवणुकीवरून धुमश्चक्री !

By admin | Published: September 6, 2015 12:47 AM2015-09-06T00:47:36+5:302015-09-06T00:47:36+5:30

आखाडा परिषदेच्या अधिकाराचा भंग करून शाहीमार्गावरून मिरवणूक काढणाऱ्या जंगलीदास महाराजप्रणीत आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर शनिवारी साधुग्राममधील

Proclamation! | मिरवणुकीवरून धुमश्चक्री !

मिरवणुकीवरून धुमश्चक्री !

Next

नाशिक : आखाडा परिषदेच्या अधिकाराचा भंग करून शाहीमार्गावरून मिरवणूक काढणाऱ्या जंगलीदास महाराजप्रणीत आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर शनिवारी साधुग्राममधील साधू-महंतांनी हल्लाबोल केला. संतप्त साधूंनी मिरवणुकीतील वाहनाची तोडफोड करीत भाविकांवर लाठ्या, शस्त्रे उगारल्याने एकच गोंधळ उडाला.
पोलिसांनी मध्यस्थी करीत आत्मा मालिक ध्यानपीठाची मिरवणूक अन्य मार्गाने वळवल्याने अनर्थ टळला. कुंभमेळ्यात यंदा प्रथमच कोकमठाण येथील विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम ट्रस्टने आत्मा मालिक ध्यानपीठ उभारले आहे. पोलिसांच्या परवानगीनंतर त्यांनी शनिवारी दुपारी साधुग्राममधून शाहीमार्गानेच गोदाघाटावर मिरवणूक निघाली.
मिरवणूक पंचवटी भागात येताच अनेक साधू लाठ्याकाठ्या, तलवारी, कुऱ्हाडी, भाले आदी शस्त्रास्त्रे घेऊन ध्यानपीठाच्या भाविकांवर चालून आले. काही भाविकांना धक्काबुक्की करीत त्यांनी मिरवणुकीतील एका वाहनाच्या काचा फोडल्या. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत दोन्ही गटांची समजूत काढली. शाहीमार्गावरून मिरवणूक काढण्याचा अधिकार व मान केवळ आखाडा परिषदेच्या साधू-महंतांनाच असून २० आॅगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान कोणालाही मिरवणुकीची परवानगी देऊ नये, असे पत्र आखाड्यांनी आधीच पोलिसांना दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारचा प्रसंग ओढावला.

साधुग्राममधील मुख्य मार्गावरून आखाड्यांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढता येत नाही. तसे पत्र पोलिसांना दिले आहे. त्यानंतरही मिरवणूक काढल्याने विरोध केला. - श्री महंत धरमदास, निर्वाणी आखाडा

मिरवणुकीला परवानगी देताना पोलिसांनी तिन्ही अनी आखाड्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. आत्मा मालिक ध्यानपीठाने आखाड्यांची परवानगी घेणे आवश्यक होते.- श्री महंत कृष्णदास, दिगंबर आखाडा

कोणाची तक्रार आल्यास तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. तथापि, दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद टाळावा. - अविनाश बारगळ, पोलीस उपायुक्त

Web Title: Proclamation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.