महाश्वेतादेवींच्या 'म्हादू' कथेवर झाली चित्रपटाची निर्मिती

By admin | Published: July 28, 2016 09:50 PM2016-07-28T21:50:21+5:302016-07-28T21:50:21+5:30

लेखिका महाश्वेतादेवी यांनी लिहिलेल्या 'म्हादू' या लघुकथेवर छायाचित्रकार आणि लेखक संदेश भंडारे यांनी याच नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली

Produced film on Mahashweta Devi's 'Mhaddu' story | महाश्वेतादेवींच्या 'म्हादू' कथेवर झाली चित्रपटाची निर्मिती

महाश्वेतादेवींच्या 'म्हादू' कथेवर झाली चित्रपटाची निर्मिती

Next

ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. 28 - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांनी लिहिलेल्या 'म्हादू' या लघुकथेवर छायाचित्रकार आणि लेखक संदेश भंडारे यांनी याच नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटासंदर्भात महाश्वेतादेवींशी झालेली भेट, त्यांचा साधेपणा, समोरच्या प्रति आदरभाव, इतरांच्या स्वातंत्र्याचा सन्मान यामुळे संदेश भंडारेंना थोर व्यक्तीच्या ख-याखु-या मोठेपणाची जाणीव झाली. हा प्रसंग मनावर कायमचा कोरला गेला आहे; महाश्वेतादेवी त्यांच्या कार्याच्या, लिखाणाच्या स्वरूपात कायम आपल्या स्मृतींमध्ये राहतील, अशी भावना संदेश भंडारे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
तमाशा- एक रांगडी कला, वारी- एक आनंदयात्रा', असाही एक महाराष्ट्र या छाया-शब्द पुस्तकांनी वेगळी ओळख निर्माण करणा-या भंडारे यांनी म्हादू या चित्रपटाची निर्मिती केली आहे. असाही एक महाराष्ट्र या पुस्तकामध्ये 'असमानतेविरुध्द महाराष्ट्र पेटून उठेल' अशा आशयाचे एक वाक्य आहे. या वाक्यातील गर्भितार्थ आणि महाराष्ट्रातील विषमतेची दरी याबाबतचा विचार संदेश भंडारे यांना स्वस्थ बसू देत नव्हता. या विषयाची कास धरून चित्रपटनिर्मिती करावी, असा विचार त्यांच्या मनात पिंगा घालत होता. हा विचार त्यांनी लेखक आणि भाषा अभ्यासक गणेश देवी यांना बोलून दाखवला. त्यांनी महाश्वेतादेवी यांच्या म्हादू कथेतील गर्भितार्थ, गांभीर्य समजावून सांगत त्या विषयावर चित्रपट निर्मिती करण्याची कल्पना सुचवली. त्यांच्या या कल्पनेवर भंडारे यांनी महिनाभर विचारमंथन केले. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिकेच्या कलाकृतीवर आधारित चित्रपट काढण्याचे दडपण त्यांच्या मनावर होते. विचार पक्का झाल्यानंतर गणेश देवींनी महाश्वेतादेवींशी त्यांना संपर्क साधून दिला.
संदेश भंडारे म्हणाले, मी ६ मार्च २०१२ रोजी कोलकात्याला जाऊन महाश्वेतादेवींची भेट घेतली. आयुष्यात कधीही न विसरता येण्यासारखा तो दिवस होता. मी त्यांना भेटायला जाताना माझी वारी, असाही एक महाराष्ट्र आणि तमाशा ही तिन्ही पुस्तके घेऊन गेलो होतो. माझ्या कामाबाबत त्यांना थोडी कल्पना यावी, हा त्यामागचा हेतू होता. भेट झाल्यावर मी त्यांना त्यांच्या कथेवर आधारित सिनेमा काढण्याची कल्पना बोलून दाखवली. तसेच हा माझा सिनेमाचा हा पहिलाच अनुभव असल्याचेही सांगितले. त्यावर महाश्वेतादेवींनी अरे त्यात काय एवढे, सत्यजितनेही पहिल्यांदाच सिनेमा काढला होता. स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवून मनात आले की सिनेमा काढायचा असे सांगत त्यांनी मनावरील दडपण काहीसे कमी झाले. त्यांनी प्रथम तमाशा हे पुस्तक चाळले. प्रत्येक पानावरील छायाचित्र आणि लेखन पाहून वा असे उदगार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. त्यानंतर इतर पुस्तकेही बारकाईने पाहिली. खिडकीतून बाहेर काम करत असलेल्या बांधकाम मजुरांकडे पाहून त्या म्हणाल्या, आपण समाजातील तळागाळातील लोकांसाठी जास्तीत जास्त काम केले पाहिजे.
संदेश भंडारे यांनी म्हादू कथेबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता सहजपणे परवानगी दिली. भंडारे चित्रपटाची पटकथा सोबत घेऊन गेले होते. कथेचे चित्रपट माध्यमात रुपांतर करताना काही बदल करावे लागतील, याबाबत विचारणा केली. त्यावर महाश्वेतादेवी म्हणाल्या, मूळ कथेमध्ये बदल करणे हा चित्रपटाच्या प्रक्रियेचाच भाग आहे. एखाद्या कलाकृतीचे रुपांतर करताना असे बदल नैसर्गिक असतात. त्यामुळे माझी काहीही हरकत नाही. एवढ्या मोठ्या व्यक्तीने एवढ्या सहजतेने, नम्रतेने दुस-या नवख्या कलाकाराच्या अभिव्यक्तीचा आदर करणे, ही महाश्वेतादेवींच्या मोठेपणाची, उदार मनाची जणू पावतीच होती.

(ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेता देवी कालवश)
भंडारे यांनी पटकथेबाबत करार, नोंदणी, लेखी परवानगी, मानधन याबाबतचा विषय काढल्यावर महाश्वेतादेवींनी लागलीच होकार दिला आणि त्याच दिवशी वकिलाकरवी करार केलाही. त्यांच्या मानधनाबाबत भंडारे यांच्या मनात थोडी साशंकता होती. मानधनाचा विषय काढल्यावर त्या म्हणाल्या, मला रॉयल्टी म्हणून केवळ एक रुपया मानधन द्या. सिनेमा परिपूर्ण करण्यासाठी त्यावर जास्तीत जास्त पैसे खर्च करा. हा मोठेपणा पाहून त्यांना भरून आले. महाश्वेतादेवींनी आपल्या सहजसोप्या वागण्यातून मला चित्रपटासाठी प्रोत्साहन दिले. चित्रपट २०१४ मध्ये पूर्ण झाला. त्यावेळी महाश्वेतादेवी वार्धक्यामुळे अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद समजू शकला नाही, याची हुरहूर वाटत असल्याचे संदेश भंडारे म्हणाले. महाश्वेतादेवींच्या आठवणी कायम मनात पिंगा घालतील, असेही ते म्हणाले.

Web Title: Produced film on Mahashweta Devi's 'Mhaddu' story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.