चित्रपट महामंडळाचा तोतया सदस्य अन् निर्माता-दिग्दर्शक ‘सॅँन्डी’ला कलावंतांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन केले पोलिसांच्या हवाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:29 PM2017-10-24T17:29:10+5:302017-10-24T17:32:59+5:30
‘चित्रपट महामंडळाचा सदस्य व्हावे, लागेल त्यानंतर तुम्हाला जाहिराती व चित्रपटात काम करता येईल, त्यासाठी महामंडळाचे कार्ड तुम्हाला मी काढून देतो, पाच ते सहा हजार रुपये शुल्क भरावे लागेल’ असे सांगून फोटोसेशन करत फोटोग्राफीचे पैसेही तो त्यांच्याकडून घेत होता.
नाशिक : चित्रपट महामंडळाचा सदस्य असल्याचे बतावणी करत जाहिराती व चित्रटपटात ‘रोल’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून महागड्या हॉटेलमध्ये तरुण-तरुणींना बोलावून त्यांचे फोटोसेशन करणाºया तोतया निर्माता-दिग्दर्शकाचा बुरखा अखेर नाशिकच्या अस्सल कलावंतांनी फाडला. पांडवलेणी येथे चित्रटपटाचे बोगस शुटिंग करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथील चित्रपट मंडळाच्या उत्तर महाराष्ट्राचे सदस्यांनी पांडवलेणी गाठले. यावेळी संदीप व्हराबळे उर्फ सॅन्डी पाटीलला घोटीमध्ये गाठून पोलिसांच्या हवाली केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सॅँन्डी हा मागील काही वर्षांपासून ‘पोर्टफोलिओ’ तयार करुन देण्याच्या नावाखाली चंदेरी दुनियेची भुरळ असलेल्या तरुण-तरुणींना गंडा घालण्याचा ‘उद्योग’ करत होता. त्याच्याविरूध्द पुण्यात पोलीस ठाण्यात विविध तक्रारीही दाखल होत्या. पुणे पोलीस ‘सॅन्डी’च्या मागावरच होते. महागड्या हॉटेलमध्ये शिर्डीमध्ये इंटरव्ह्यू घेत मुला-मुलींकडून पैसे उकळत होता. ‘चित्रपट महामंडळाचा सदस्य व्हावे, लागेल त्यानंतर तुम्हाला जाहिराती व चित्रपटात काम करता येईल, त्यासाठी महामंडळाचे कार्ड तुम्हाला मी काढून देतो, पाच ते सहा हजार रुपये शुल्क भरावे लागेल’ असे सांगून फोटोसेशन करत फोटोग्राफीचे पैसेही तो त्यांच्याकडून घेत होता. दरम्यान, त्याने मुंबईच्या दोन महिला कलावंतांनाही भुरळ पाडून त्यांना शिर्डी येथे शुटिंगसाठी बोलविले. मुंबईच्या मेकअप आर्टिस्ट व कोपरगावच्या एका प्रोफेशनल कॅमेरामनलाही त्याने गाठले. दोन दिवस शिर्डीच्या आजुबाजुच्या परिसरात शुटिंग केले यावेळी भाडोत्री इनोव्हा कारचा वापर केला.
रुपया खर्च न करता आलिशान ‘शुटींग’चा खेळ
मेकअपआर्टिस्ट, महिला कलावंत, कॅमेरामन, कारचा ड्राईव्हर, हॉटेलचालक अशा सर्वांनाच एकही रुपया न देता त्याने आलिशान ‘डाव’ थाटात पुर्ण केला. दोन्ही महिलांकडून प्रत्येकी सात ते आठ हजार रुपये उकळले. सॅन्डीवर विश्वास ठेवून त्या दोघी कलावंत मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. कोपरगावचा कॅमेरामन सुयोगकडे त्याने अजून कलाकार मिळतील का? असा प्रश्न केला. सुयोगने शैलेश शिंदे यांच्याशी त्याची भेट घालून दिली. त्यावेळी शिंदे यांना त्याच्यावर संशय बळावला. भेटीच्या दुसर्या दिवशी सुयोगने मेकअप आर्टिस्टपासून तर इनोव्हाच्या ड्राईव्हर आणि हॉटेलचालकाचे फोन आले की डायरेक्टर सॅन्डी हॉटेल सोडून फरार झाला आहे.
व्हॉटस्अॅपवरून हलली सुत्रे
सुयोगने सदर बाब शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. शिंदे यांनी त्या भामट्याचे छायाचित्र कलावंतांच्या व्हॉटस्अॅपग्रूपमध्ये पोस्ट केले. त्यानंतर नाशिकचे श्याम लोंढे यांनी याबाबत सुत्रे हलविली. ज्या गाडीने सॅन्डीने पळ काढला ती गाडी ओळखीची असल्यामुळे गाडीमध्ये असलेल्या जीपीआरएसवरून गाडी मुंबईमध्ये नसून ती नाशिकच्या पांडवलेणी परिसरात असल्याचे लोकेशन मिळाले. त्यानंतर लोंढे, रफिक सय्यद, रवी जन्नावर, मयूर रोहम आदिंनी पांडवलेणी गाठले. यावेळी सॅन्डीने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तेथून पळ काढत महामार्गावरून काळी-पिवळी मारुतीने घोटी गाठले. यावेळी सॅन्डीने ड्रायव्हरला सांगून कारदेखील घोटीला बोलावून घेतली. लोंढे यांच्या टीमने मोटारीने घोटी गाठले. यावेळी घोटीमधील एका एटीएमच्या बाहेर त्यांना सॅन्डी मिळून आला. त्यांनी त्याची विचारपूस केली असता त्याने घोटीमध्ये पळण्यास सुरूवात केली.
अपहरणाचा केला बनाव
सॅन्डी याने १०० क्रमांकावर माहिती देऊन माझे अपहरण चार ते पाच लोक करत आहेत आणि लोकेशन सांगितले. घोटीच्या स्थानिक पोलिसांनी लोंढे यांच्यासह सॅन्डीला पकडले. यावेळी पुणे पोलिसांनी वायरलेसवरून मॅसेज पास केल्यामुळे भामटा सॅन्डीचे पितळ उघडे झाले आणि लोंढे यांच्या सहकार्यानी त्याला पकडून ठेवल्यामुळे तो पोलीसांना मिळाला. पुणे पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने त्यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सॅन्डी हा आर्किटेक्ट असून त्याने पुण्याच्या महाविद्यालयातून पदवी घेतली आहे.