जागतिक दर्जाची ‘फिल्मसिटी’ तयार करणार
By admin | Published: January 9, 2015 01:20 AM2015-01-09T01:20:11+5:302015-01-09T01:20:11+5:30
महाराष्ट्राचे ‘ब्रँण्डिंग’ करायचे असेल तर गड-किल्ले, वने यांच्या समृद्धतेबरोबरच ‘बॉलिवूड’लाही समाविष्ट करावे लागेल
पुणे : महाराष्ट्राचे ‘ब्रँण्डिंग’ करायचे असेल तर गड-किल्ले, वने यांच्या समृद्धतेबरोबरच ‘बॉलिवूड’लाही समाविष्ट करावे लागेल. याच दृष्टीने जागतिक दर्जाची ‘फिल्मसिटी’ निर्माण करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’साठी पुढील वर्षीपासून एक खिडकी योजना राबविण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
राज्य शासनाच्या सहकार्याने आयोजित १३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (फिफ) उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अतुलनीय योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री तनुजा मुखर्जी, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
यंदाच्या महोत्सवाची ‘युद्ध’ ही संकल्पना खूप उत्तम आहे. ‘युद्धाशी युद्ध’ यापेक्षा चांगली संकल्पना असूच शकत नाही. जगात मानवतेशीच युद्ध सुरू असून भाषेची कोणतीही सीमा नसलेल्या चित्रपटांनीच त्याचा मुकाबला करता येऊ शकतो. आपले विचार आणि संस्कृती पोहोचविण्याचे चित्रपट हेच उत्तम माध्यम आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
चित्रपटनिर्मिती हा आता एक मोठा व्यवसाय बनला आहे. यासाठीच महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी जगभराचे आकर्षण असलेली ‘फिल्मसिटी’ निर्माण केली जाणार आहे. सगळे चित्रपट इथेच तयार व्हावेत यासाठी मुंबई फिल्मसिटी, कोल्हापूर चित्रनगरी आधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानांनी सुसज्ज करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
च्यंदाच्या महोत्सवाची ‘युद्ध’ ही संकल्पना खूप उत्तम आहे. ‘युद्धाशी युद्ध’ यापेक्षा चांगली संकल्पना असूच शकत नाही. जगात मानवतेशीच युद्ध सुरू असून भाषेची कोणतीही सीमा नसलेल्या चित्रपटांनीच त्याचा मुकाबला करता येऊ शकतो. आपले विचार आणि संस्कृती पोहोचविण्याचे चित्रपट हेच उत्तम माध्यम आहे
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डावीकडून महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, अभिनेता शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल व सुभाष घई.