‘डेक्कन कलर’वर उत्पादन बंदी
By admin | Published: September 22, 2014 02:32 AM2014-09-22T02:32:26+5:302014-09-22T02:32:26+5:30
येथील एमआयडीसी फेज-२ मधील ‘डेक्कन कलर अॅण्ड केमिकल कंपनी’वर निष्काळजीपणासह नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे.
डोंबिवली : येथील एमआयडीसी फेज-२ मधील ‘डेक्कन कलर अॅण्ड केमिकल कंपनी’वर निष्काळजीपणासह नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. प्रदूषण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी उत्पादन बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे या परिसरात प्रदूषण करणाऱ्या अन्य कंपनीचालकांमध्ये धास्ती पसरली आहे.
गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर विशिष्ट पावडर पडली असून ती पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने ते पाणी निळे-हिरवे झाल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली. त्यानुसार, मंडळासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाला भेट दिली. तेव्हा ‘डेक्कन कलर अॅण्ड केमिकल’ या खाद्यपदार्थांचे रंग बनवणाऱ्या कंपनीचा माल नेण्यात येत असताना गळती झाल्याने काही माल रस्त्यावर पडला. पावसाच्या पाण्याच्या संपर्कात येऊन तसा रंग झाला आणि शहरात पुन्हा एकदा प्रदूषणयुक्त पावसाची चर्चा वाऱ्यासारखी पसरल्याचे निदर्शनास आले, मात्र ही घटना त्या हिरव्या पावसाच्या घटनेसारखी नसल्याचा निर्वाळा उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी तत्काळ दिला होता. कंपनीच्या निष्काळजीपणाबाबत आणि मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कंपनीला उत्पादन
करण्यास बंदी घातल्याचेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात मंडळाने कंपनीला नोटीस बजावली असून तिची प्रत मनसेच्या राजेश कदम यांनाही दिली आहे. तसेच आगामी काळात अन्य नागरिकांनीही सतर्क राहून मंडळाच्या निदर्शनास काही बाबी आणून दिल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही. त्यासाठी मंडळही सतर्क असून नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे आवाहन त्यांनी केले.