गणेशोत्सवातील निर्माल्यापासून होतेय खत निर्मिती

By Admin | Published: September 21, 2016 04:05 AM2016-09-21T04:05:27+5:302016-09-21T04:05:27+5:30

निर्माल्यापासून खत निर्मितीचे काम रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थाने हाती घेतले आहे.

Production of fertilizer from Ganeshotsav production | गणेशोत्सवातील निर्माल्यापासून होतेय खत निर्मिती

गणेशोत्सवातील निर्माल्यापासून होतेय खत निर्मिती

googlenewsNext

जान्हवी मोर्ये,

डोंबिवली- गणेशोत्सवात तयार झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मितीचे काम रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थाने हाती घेतले आहे. त्यासाठी प्रतिष्ठानने १० दिवसांत कल्याणमधून १० टन निर्माल्य तर गणेश मंदिराने १० टेम्पो जैव कचरा गोळा केला. भक्ती मार्गाने पर्यावरण संरक्षण करता येते, असा संदेश या संस्थांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनी त्याचे अनुकरण केल्यास कल्याण-डोंंबिवलीतील कचऱ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल, अशा आशावाद त्यांनी यानिमित्त व्यक्त केला आहे.
प्रतिष्ठानचे कल्याण सदस्य अध्यक्ष अशोक शिंदे यांनी सांगितले की, कल्याणमधील गणेशघाट येथे दीड दिवसाच्या विसर्जनापासून निर्माल्य गोळा करण्यासाठी २०० सेवेकरी नेमले होते. त्यांनी जवळपास १० टन निर्माल्य गोळा केले. त्यातून केवळ जैव कचरा घेतला. त्यातील प्लॅस्टिकच्या पिशव्या वेगळ््या केल्या. लाल चौकी स्मशानभूमीजवळ १५ फूट रुंद, ३० फूट लांब आणि पाच फूट खोल, असा खड्डा खणला. त्यात दररोज जमा झालेले निर्माल्य टाकले. दर दिवशी त्यावर शेणाचा थर व पाणी टाकले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी चांगले ढवळून घेतले. त्यातून खत निर्माण होईल. प्रतिष्ठाने स्वखर्चाने हा उपक्रम राबवला आहे. त्याची प्रेरणा व संकल्पना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांची होती. या उपक्रमातून कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी जागृती करण्यात आली.’
>गणेश मंदिर संस्थानने केली जागृती
डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानातर्फे निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाते. मात्र यंदा प्रथमच गणेशोत्सवात संस्थाने त्याची जागृती केली.
नेहरू मैदान, पंचायत बावडी, नांदिवली रोड, प्रगती कॉलेज, एमआयडीसी आणि गणेश मंदिर संस्थान या विसर्ज स्थळांहून निर्माल्य गोळा केले. १० दिवसांत १० टेम्पो भरले इतके निर्माल्य गोळा झाले. त्यातून प्लॅस्टिक वेगळे केले. जैव कचऱ्यापैकी सुका जैव कचरा बारीक करण्यासाठी मंदिराकडे क्रश मशीन आहे. एमआयडीसीतील जागेत या कचऱ्यापासून खत तयार केले जाते.
खत तयार होण्यासाठी साधारणात: तीन आठवडे लागतात. शेण व पाणी टाकून थर लावला जातो. ते दोन तीन दिवसांनी ढवळून घेतले जाते. तयार झालेले खत मंदिर प्रति किलो १० रुपयाने विकते.
देवाला वाहिलेले फूल पुन्हा देवाच्या चरणी वाहण्यासाठी हा उपक्रम आहे.
>खताचा वापर झाडांसाठी
कल्याण-डोंबिवलीत घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिकेने उपक्रमास सहकार्य केल्यास हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू करता येऊ शकतो, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. या उपक्रमात तयार होणाऱ्या खताचा वापर प्रतिष्ठानने नेवाळी, टिटवाळा, पडघा, मलंग रोड, फडके रोड, गणेश घाट येथे लावलेल्या झाडांसाठी केला जाणार आहे.
>पर्यारण संरक्षणासाठी हा उपक्रम राबविल्याचे मंदिराचे पदाधिकारी प्रवीण दुधे यांनी सांगितले. गणेश मंदिर संस्थानचा आदर्श केडीएमसीने घेतल्यास स्वच्छ व सुंदर डोंबिवली लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते, असा विश्वास मंदिर संस्थानला आहे. त्यात संस्थानचा सक्रिया सहभाग असेल, अशी हमीही दुधे यांनी दिली.

Web Title: Production of fertilizer from Ganeshotsav production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.