कारागृहातील शेतीमधून कैद्यांनी घेतले ३.६४ कोटींचे उत्पादन
By admin | Published: October 14, 2016 05:33 PM2016-10-14T17:33:54+5:302016-10-14T17:46:46+5:30
राज्यातील २९ कारागृहांमध्ये शेती उपयोगी क्षेत्र आहे. त्यामधील कैदी कित्येक वर्षापासून शेतीचे उत्पादन घेतात.
Next
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १४ - राज्यातील २९ कारागृहांमध्ये शेती उपयोगी क्षेत्र आहे. त्यामधील कैदी कित्येक वर्षापासून शेतीचे उत्पादन घेतात. सन २०१५-१६ या वर्षामध्ये कारागृहातील कैद्यांनी ३.६४ कोटी रुपयांचे उत्पादन घेतले असून गेल्या सातवर्षामध्ये राज्यभरातील कारागृहातील शेतीच्या उत्पादनाचा आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील २९ कारागृहांमध्ये एकूण ८१९.५८ हेक्टर जमीन आहे. त्यापैकी एकूण शेती उपयोगी क्षेत्र ३२७.२३ हेक्टर आहे. कारागृहातील कैद्यांना दैनंदीन आहारासाठी लागणारा भाजीपाला, अन्नधान्य हे कारागृहाच्या शेती क्षेत्रावर उत्पादीत केले जाते. या क्षेत्रामध्ये खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, भात, गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन, केळी व इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते.
तसेच काही कारागृहामध्ये दुध व मासे यांचे उत्पादन घेतले जाते. सन २०१५-१६ या वर्षामध्ये कारागृह शेतीवरती ८२९ पुरूष बंदी व ४० महिला बंद्यांना दररोज कारागृह शेतीमध्ये काम मिळालेले आहे. सन २०१५-१६ मध्ये कारागृहातील शेतीमध्ये ३.६४ कोटी रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. त्यासाठी १.६० कोटी रुपये खर्च झाला असून, २.४ कोटी रुपये फायदा झाला आहे.
गेल्या सातवर्षामध्ये कारागृहातील शेतीच्या उत्पादनाचा आलेख वाढतच असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये सन २००९-१० मध्ये १.७८ कोटी उत्पादन झाले. तर सन २०१०-११ मध्ये १.७२ कोटी, सन २०११-१२ मध्ये १.७८ कोटी, सन २०१२-१३ मध्ये २.१७ कोटी, सन २०१३-१४ मध्ये २.५४ कोटी, सन २०१४-१५ मध्ये ३.३४ कोटी व सन २०१५-१६ मध्ये ३.६४ कोटी रुपये उत्पादन झाले आहे. बंद्यांना रोजगाराद्वारे कमाई होण्यासाठी व त्यांचे पुनर्वसनासाठी अनुभव मिळावा यादृष्टिने कारागृह विभागाने फळभाजी, पालेभाजी, अन्नधान्य उत्पादन याव्यतिरीक्त राज्यातील कारागृहात रोपवाटीका विकासित करण्यात आल्या आहेत. काही कारागृहात मत्सपालन उद्योग, मशरूम उत्पादन युनिट विकसित करण्यात आले आहे. काही कारागृहात गांडूळ खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत आहेत.
सात वर्षात ८.७७ कोटी रुपये नफा
कारागृहामध्ये शेतीची कास धरत शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सन २००९-१० ते सन २०१५-१६ या सात वर्षाच्या कालावधीमध्ये कारागृहातील कैद्यांनी सुमारे १६.९७ कोटी रुपयांचे शेती उत्पादन घेतले आहे. त्यामध्ये ८.२ कोटी रुपये कारागृहाला शेती उत्पादनासाठी खर्च आला. तर ८.७७ कोटी रुपये शेती उत्पादनातून नफा मिळाला आहे.
कारागृहातील ५७ टक्के क्षेत्र बागायती
कारागृहांमधील एकूण ८१९.५८ हेक्टर जमीन असून त्यापैकी ३२७.२३ हेक्टर क्षेत्र शेती उपयोगी आहे. शेती क्षेत्रापैकी ५७ टक्के म्हणजे १८६.५२ हेक्टर क्षेत्र बागायत आहे. तसेच १४०.७१ हेक्टर क्षेत्र जिरायत आहे. तसेच वनीकरणाखालील १८०.७७ हेक्टर व पडिक क्षेत्र ८०.९१ हेक्टर आहे. तसेच उर्वरीत २३०.६७ हेक्टर क्षेत्रामध्ये कारागृह इमारती, कर्मचारी, अधिकारी निवासस्थाने, अंतर्गत रस्ते, विविध कार्यालये, मैदाने, बाजार पेठ, स्मशान भुमी, वायु सेनेस करारावर दिलेल्या जमीनी, महानगरपालिकेस रस्ता रुंदी करणासाठी, सामाजिक न्याय विभागास दिलेल्या क्षेत्राचा समावेश आहे