रिलायन्स नागपूरमध्ये करणार प्रवासी विमानांचे उत्पादन

By admin | Published: May 14, 2016 01:27 PM2016-05-14T13:27:16+5:302016-05-14T13:42:45+5:30

रिलायन्स डिफेन्स ही अनिल अंबानी समूहाची कंपनी भारतामध्ये प्रवासी विमानांचे उत्पादन करण्याचा विचार करत आहे

The production of passenger aircraft will be done in Reliance, Nagpur | रिलायन्स नागपूरमध्ये करणार प्रवासी विमानांचे उत्पादन

रिलायन्स नागपूरमध्ये करणार प्रवासी विमानांचे उत्पादन

Next
>- मिहानमध्ये 6,500 कोटी रुपयांचा प्रकल्प
- 25 वर्षातली पहिलीच भारतीय कंपनी
- युक्रेनमधल्या अंतोनोव्हशी केला भागिदारी करार
 
ऑनलाइन लोकमत
 
हैदराबाद, दि. 14 - रिलायन्स डिफेन्स ही अनिल अंबानी समूहाची कंपनी भारतामध्ये प्रवासी विमानांचे उत्पादन करणार आहे. युक्रेनमधल्या अंतोनोव्ह या कंपनीशी संयुक्त भागिदारी करून भारतामध्ये 50 ते 80 आसनक्षमता असलेल्या प्रवासी वाहतुकीच्या विमानांचे उत्पादन करण्याचे कंपनीने निश्चित केल्याचे रिलायन्स डिफेन्सचे अध्यक्ष एम. माथेश्वरन यांनी सांगितले. जगातलं सगळ्यात मोठं मालवाहतूक करणारं अंतोनोव्हचं विमान म्रिया दी ड्रीम शुक्रवारी भारतात लँड झाले असून या पार्श्वभूमीवर माथेश्वरन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
जगातलं सगळ्यात मोठं मालवाहूतक विमान हैदराबादमध्ये लँड
 
 
हिंदुस्थान एरोनॉटिक्सही या म्हणजे 50 ते 80 आसनक्षमता असलेल्या प्रवासी श्रेणीतल्या विमानांच्या उत्पादनांचा विचार करत आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्सने 25 वर्षांपूर्वी प्रवासी विमानांचं उत्पादन बंद केलं. त्यामुळे रिलायन्सची योजना प्रत्यक्षात उतरली तर ती 25 वर्षातली असं करणारी पहिलीच कंपनी ठरणार आहे. रिलायन्स व हिंदुस्थान एरोनॉटिक्स एकत्र येऊन या प्रकल्पासाठी काम करण्याची चाचपणीही सुरू आहे. भारतामध्ये येत्या काळात या प्रकारच्या सुमाऱे 200 विमानांना मागणी असल्याचा अंदाज आहे.
भारतामध्ये टिअर 2 व टिअर 3 या श्रेणीतली म्हणजे बऱ्यापैकी मोठी अशी जवळपास 400 शहरं असून या शहरांना हवाईमार्गाने जोडण्यासाठी 50 ते 80 आसन क्षमता असलेली विमाने आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
 
6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक
 
रिलायन्स व अंतोनोव्हमध्ये 51:49 टक्के भागिदारीचा करार करण्यात येणार असून नागपूरच्या एरोस्पेस पार्कमध्ये विमानांची सुरुवातीला असेंब्ली करण्यात येणार आहे. सुमारे 6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये 15 ते 20 वर्षांमध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची विमाने तयार करण्याची योजना आहे. मिहानमधला हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा आहे.
 
उपखंडात व जागतिक स्तरावर निर्यातीचे लक्ष्य
 
अंतोनोव्ह कंपनीसोबतची भागिदारी केवळ भारतीय बाजारपेठेला समोर ठेवून करण्यात आली नसल्याचे माथेश्वरन म्हणाले. कमी किमतीच्या विमानांची भारतीय उपखंडातील मागणी तसेच जागतिक बाजारात असलेल्या संधी यांचाही विचार करून निर्यातीचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The production of passenger aircraft will be done in Reliance, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.