समीरचे रुद्र पाटीलशी व्यावसायिक संबंध

By admin | Published: September 21, 2015 01:15 AM2015-09-21T01:15:22+5:302015-09-21T01:15:22+5:30

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक केलेला सनातनचा साधक समीर गायकवाड आणि मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार संशयित रुद्र पाटील या दोघांमध्ये व्यावसायिक संबंध होते.

Professional relationship with Sameer Rudra Patil | समीरचे रुद्र पाटीलशी व्यावसायिक संबंध

समीरचे रुद्र पाटीलशी व्यावसायिक संबंध

Next

सुशांत कुंकळयेकर, मडगाव
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक केलेला सनातनचा साधक समीर गायकवाड आणि मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार संशयित रुद्र पाटील या दोघांमध्ये व्यावसायिक संबंध होते. २00६पर्यंत ते सांगलीत भागीदारीने मोबाइलचे दुकान चालवित होते. त्यामुळे हत्येचा मास्टरमाइंड रुद्र असण्याची शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत.
२00९च्या मडगाव बॉम्बस्फोटानंतर समीरची एनआयएने चौकशी केली. त्यानंतर मालकाने समीरकडून दुकान काढून घेतले. रोजीरोटी नसल्यामुळे त्याने ‘सनातन’चे काम सुरू केले, असे ‘सनातन’शी संबंध असलेले अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी सांगितले.
पानसरे यांच्या हत्येनंतर त्याने कित्येकांशी फोनवरून संपर्क साधला होता. यावरूनच पोलीस समीरपर्यंत पोहोचले. पुनाळेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे, समीरला फोन बदलायची सवय होती. त्याशिवाय तो थापाड्याही होता. याच सवयीमुळे तो गोत्यात आला.

पानसरे हत्येसंदर्भात भक्कम पुरावे हाती लागले असल्याचे पोलीस ठामपणे सांगत आहेत. परंतु, अद्याप पोलिसांनी गायकवाड सोडून कोणालाही अटक केलेली नाही. ज्योती कांबळे व एक नातेवाईक गेले पाच दिवस चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यांना अटक केली नसल्याने पोलिसांच्या तपासाची नेमकी दिशा स्पष्ट होऊ शकलेली नाही.

समीरला अटक केल्यानंतर सांगली पोलिसांनी त्याच्या घराची व दुकानाची झडती घेतली. या वेळी २३ मोबाइल, रॅम्बो चाकू, ‘सनातन’ धर्माची २० पुस्तके, कॅप, भित्तीपत्रके, हिशेबाच्या पावत्या, लग्नपत्रिका, बँकेचे पासबुक, डायरी आदी साहित्य ताब्यात घेण्यात आले. हे संपूर्ण साहित्य पोलिसांनी जप्त करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात दिले होते. रविवारी सकाळी गुन्हे अन्वेषण शाखेने हा मुद्देमाल राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांच्या ताब्यात दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड याच्यासह त्याची प्रेयसी ज्योती कांबळे व नातेवाईक अशा तिघांकडे कोल्हापूर पोलिसांसह पुणे सीबीआय व कर्नाटकातील सीआयडी पथक कसून चौकशी करीत आहे.
तर, राजारामपुरी पोलिसांनी रविवारी समीरच्या सांगलीतील घरातून जप्त केलेले साहित्य सीलबंद करून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांना धमकी आध्यात्मिक दृष्टिकोनातून
पुणे : ‘सनातन प्रभात’ने पोलिसांनाच धमकीवजा इशारा दिला असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे सनातनने एक पाऊल मागे घेत संकेतस्थळावर खुलासा प्रसिद्ध केला आहे. आम्ही पोलिसांना आध्यात्मिक शिक्षा करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड याच्या नातेवाइकांचा पोलीस नाहक छळ करीत असल्याचा सनातन संस्थेचा आरोप आहे. यासंदर्भात मुखपत्र ‘दैनिक सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात ‘साधकांचा छळ करणाऱ्या पोलिसांची नावे सनातनने प्रसिद्ध केली असून, त्यांना हिंदू राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा केली जाईल,’ असे म्हटले आहे. ही पोलिसांसाठी धमकीच असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
याचे तीव्र पडसाद उमटत असल्याचे निदर्शनास येताच सनातनने बचावात्मक पवित्रा घेत संकेतस्थळावर खुलासा प्रसिद्ध केला. ‘पोलिसांना शिक्षा करणार’ हे विधान आम्ही आध्यात्मिक अंगाने केले असल्याचे यात म्हटले आहे. आध्यात्मिक कार्यासाठी व्यक्तींची नावे का प्रसिद्ध करावी लागतात, अशी कुठल्याही प्रकारची शिक्षा करण्याचा अधिकार सनातनला कोणी दिला, याबाबत यात काहीही भाष्य करण्यात आलेले नाही.

पुणे : राज्य शासनाने सनातन संस्थेवर यापूर्वीच बंदी घातली असती तर डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या टाळता आल्या असत्या. राज्य शासनाने आता तरी सनातनबाबतची भूमिका जाहीर करावी, अशी मागणी डॉ. दाभोलकर यांच्या कन्या व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी रविवारी केली.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षे एक महिना पूर्ण झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला अंनिसचे कार्यकर्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर एकत्र जमून दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्याची मागणी करीत आहेत. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्रामधून गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने अंनिस व डॉ़ दाभोलकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह लेखन प्रसिद्ध केले जात होते.
दाभोलकर यांना उघड उघड धमक्या दिल्या जात होत्या. मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपीने ‘अंनिसच्या लोकांना मारले पाहिजे,’ अशी भाषा वापरली होती. पोलिसांनी त्याचवेळी याची गांभीर्याने दखल घेऊन सनातन संस्थेवर बंदी आणली असती तर दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या रोखता आल्या असत्या, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Professional relationship with Sameer Rudra Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.