शहिदांच्या कुटुंबीयांना व्यावसायिक प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:35 AM2019-10-14T11:35:27+5:302019-10-14T11:36:17+5:30

मोफत प्रशिक्षण : माहिती तंत्रज्ञान आणि इतर अभ्यासक्रमांचा समावेश

Professional training for the families of death soldiers | शहिदांच्या कुटुंबीयांना व्यावसायिक प्रशिक्षण

शहिदांच्या कुटुंबीयांना व्यावसायिक प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देवीरनारी, पुत्र, निवृत्त सैनिकांना फायदा

पुणे :  शहीद जवानांच्या कुटुंबीयांना, तसेच माजी सैनिकांना त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया (डीएमजीएसए) च्या माजी  सैनिकांच्या संघटनेतर्फे माहिती तंत्रज्ञान आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  हे प्रशिक्षण विनामूल्य असून यामुळे आयटी आणि आयटीईएससारख्या  उद्योगांमध्ये आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास या अभ्यासक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.
सीमेवर लढताना एखादा सैनिक शहीद झाल्यावर शासकीय नियमानुसार त्याच्या कुटुंबीयांना अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र, वीरपत्नी, वीरपुत्र, तसेच शहिदांच्या कुटुंबीयांतील अनेकांकडे कौशल्य नसल्याने त्यांना मोठ्या उद्योगांमध्ये रोजगार मिळविताना अनेक अडचणी येतात. रोजगार नसल्यामुळे त्यांना कुटुंब चालविताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यांची ही अडचण ओळखून त्यांचा कौशल्य विकास करण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे. 
ग्राहक संबंध व्यवस्थापन, डेटा एन्ट्री, तसेच माहिती तंत्रज्ञान उद्योगात या अनेक रोजगार आहेत. या संधी सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळण्यासाठी त्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीचे दोन अभ्यासक्रम आयोजिण्यात येणार आहेत. त्यानुसार व्यावसायिक कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. प्रशिक्षण दिल्यावर कंपन्यांमध्ये रोजगार शोधण्यासाठीही त्यांना मदत केली जाणार आहे. सुरुवातीला ७५ जणांना या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. तीन तुकड्यांमध्ये पिरंगुट, बालेवाडी आणि हडपसर येथे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  यासोबतच व्यावसायिक कौशल्याबरोबरच  कामाच्या ठिकाणचे वातावरण, आत्मविश्वास तसेच इतर गोष्टींचेही प्रशिक्षण त्यांना दिले जाणार आहेत.
.......
वीरनारी, पुत्र, निवृत्त सैनिकांना फायदा

च्राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच आदी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीरनारी, वीरपुत्र तसेच निवृत्त सैनिकांची संख्या मोठी आहे. या अभ्यासक्रमाची संकल्पना ही अतिशय चांगली आहे. 
च्याबाबत या माजी सैनिकांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना याबाबत माहिती दिल्यास या अभ्यासक्रमाचा फायदा त्यांना होणार आहे. या माध्यमातून त्यांना नवा रोजगार मिळवता येणार आहे. 
....
 

Web Title: Professional training for the families of death soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.