आंदोलन चिघळण्यास प्राध्यापकही जबाबदार
By admin | Published: October 4, 2015 02:07 AM2015-10-04T02:07:40+5:302015-10-04T02:07:40+5:30
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना हटवावे, या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला विद्यार्थीच
पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना हटवावे, या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला विद्यार्थीच जबाबदार असून प्राध्यापकांनी वेळावेळी आपली भूमिका बदलली तसेच जबाबदारीचे भान न ठेवता आंदोलनाला हवा दिली, असा ठपका केंद्र सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने ठेवला आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन १२ जूनपासून सुरू असून या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने रजिस्ट्रार आॅफ न्यूजपेपर एस. एम. खान यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती नेमली होती. २००८ तुकडीचा बॅकलॉग राहण्यात विद्यार्थीच दोषी असल्याचे समितीने म्हटले आहे.
एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला होता, त्यावेळचे फूटेज पाहिल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार का दिली याची कल्पना येते. त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण होता. त्यामुळेच त्यांनी पोलिसांत तक्रार केली, असे नमूद करत, एफआयआर मागे घेण्याची मागणी विद्यार्थी करत असतील तरी कायद्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण व्हावी, असेही समितीने म्हटले आहे.
एफटीआयआयमधीलच माजी विद्यार्थी असलेल्या काही प्राध्यापकांकडून तसेच येथे वारंवार भेट देणाऱ्या अतिथी प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्न केला गेला. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा, यासाठी त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, असे निरीक्षणही समितीने नोंदविले आहे.
काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून अयोग्य पद्धतीचे वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र, या अहवालातून वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत पाठराबे यांनी दिली.